Mon, Jun 17, 2019 04:31होमपेज › Belgaon › कुख्यात चेनस्नॅचर जेरबंद

कुख्यात चेनस्नॅचर जेरबंद

Published On: Jun 19 2018 1:33AM | Last Updated: Jun 18 2018 11:50PMबंगळूर : प्रतिनिधी

बेळगावसह राज्यभारात सोनसाखळीच्या चोर्‍यांमध्ये शतक गाठलेल्या कुख्यात चेनस्नॅचर अच्युतकुमार गणी याला बंगळूर शहर पश्‍चिम पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसावर हल्ला करून पळून जात असताना गोळीबार करून त्याला जेरबंद करण्यात आले.

बेळगावसह हुबळी, धारवाड, गदग, रायचूर, बंगळूरसह विविध शहरांत त्याने 100 पेक्षा जास्त चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याची माहिती पश्‍चिम विभागाचे डीसीपी रवी चन्‍नण्णवर यांनी दिली आहे. 
रस्त्याने जाणार्‍या एकट्या महिलांना गाठून त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्रे व चेन हिसकावण्याचे काम गणी करीत होता. आतापर्यंत त्याच्याविरुध्द 100 पेक्षा जास्त गुन्हे नोंद करण्यात आल्याची माहिती डीसीपी रवी चन्नण्णवर यांनी दिली. 

बेळगावात तीन वर्षांपूर्वी चेनस्नॅचिंग वाढले होते. एकाच दिवशी तीन-चार घटना घडत होत्या. त्यामागे इराणी टोळी असल्याचा संशय होता. त्याबद्ल 8 जणांना अटकही झाली होती. काही चेनस्नॅचिंगमागे अच्युतकुमार गणीही होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

बंगळूर पश्‍चिम विभागामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना वाढल्यानंतर ज्ञानभारती व केंगेरी पोलिस ठाणे व्याप्तीमध्ये गस्त वाढविण्यात आली होती. रविवारी रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान वाहनांची ये-जा सुरू असताना ज्ञानभारतीजवळ पल्सर मोटरसायकलवरून एक युवक चालला होता. त्याने पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. खाली पडलेल्या त्या युवकाला पकडण्याकरिता हवालदार चंद्रकुमार हे गेले असता त्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला व पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी घटनास्थळी इतर पोलिस पोचले. त्यांनी त्याला आपल्या ताब्यात घेवून चौकशी केली असता तोच अच्युतकुमार गणी असल्याचे पोलिसांना समजले. 

ज्ञानभारती पोलिस ठाण्यामध्ये त्याची प्राथमिक चौकशी करून अधिक चौकशीसाठी त्याला रात्री अडीचच्या दरम्यान पोलिस व्हॅनमधून नेण्यात येत होते. त्यावेळी केंगेरी लाईट क्‍लबजवळ लघुशंका करण्याच्या निमित्ताने त्याने पोलिस व्हॅन थांबवली. त्यावेळी त्याने त्यांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने सहाय्यक फौजदार वीरभद्रय्या यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दगडांनी  पोलिसांवर हल्ला करण्यासाठी तो पुढे सरसावला होता. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक प्रविण यलिगार यांनी रिव्हॉल्व्हरने गणीवर गोळीबार केला.  त्यात त्याच्या पायाला जखम झाली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेवून इस्पितळात दाखल केले. पोलिसांनी त्याच्याकडून चाकू व इतर वस्तू जप्त केल्या आहेत.