होमपेज › Belgaon › सविताच नव्हे, कुटुंबच ‘विशाल हृदयी’

सविताच नव्हे, कुटुंबच ‘विशाल हृदयी’

Published On: Mar 06 2018 12:08AM | Last Updated: Mar 05 2018 11:23PMबेळगाव : सतीश जाधव

जन्मल्यानंतर अवघ्या तीन दिवसांपासूनच रोज अंगातील रक्त बदलायचे म्हणजे किती वेदना...नंतर महिन्यातून एकदा रक्तबदली...अशी 42 वर्षे वेदनेतच गेली...पण जाताना तिने अनेकांच्या चेहर्‍यांवर स्मित दिले...आणि सोबत दिली मनात जगण्याची आशा  आणि दान करण्याचे बीज. या विशालहृदयी महिलेचे नाव सविता पवार. तिने आपले हृदय दान करून दानाच्या पवित्र क्षेत्रात नवा आयाम गाठला आहे. 

“सविताला उपजतच रक्तांमध्ये तांबड्या पेशी कमी असल्याने एकदा रक्तस्त्राव सुरू झाला की थांबतच नव्हता. त्यामुळे महिन्याला एकदा तिला तिच्या गटाचे बी पाझिटिव्ह ताजे रक्त शरीरात चढवावे लागत होते. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार सविताला आम्ही फुलाच्या पाकळीप्रमाणे ठेवले होत”, अशी भावनिक प्रतिक्रिया सविताची आई पुष्पा पवार यांनी दै‘पुढारी’कडे व्यक्त केली.

आज सविताचे हृदय वीरगौडा पाटील या अथणी तालुक्यातील युवकाच्या शरीरात धडधडते आहे आणि त्याचा आनंद सविताच्या कुटुंबालाही आहे. वैभवनगरात हे कुटुंब राहते. 
पुष्पा पवार म्हणाल्या, सविताने खचून न जाता आम्हाला धैर्याने साथ दिली. लहानपणी तिच्यावर मिरज येथील रुग्णालायात उपचार केले. तिथेच तिच्या आजाराचे निदान झाले होते. पण घरची परिस्थिती हलाखीची असल्याने वारंवार मिरजला जाणे आम्हाला परवडले नाही. मग सिव्हिल इस्पितळात तिचे रक्त बदलून घेतले. रक्त बदलल्यानंतर काही मिनिटातंच ती ताजीतवानी होत होती. आठ वर्षांची असतानापासून डॉ. व्ही. डी. पाटील यांच्याकडे उपचार सुरु होते. तीस वर्षापूर्वी 250 रुपयांना रक्ताची पिशवी खरेदी करून रक्त बदलले जात होते. तिन्ही बहिणींमध्ये ती मोठी. बी. ए. झाल्यानंतर एका खासगी कंपनीत नोकरी करत दोन्ही बहिणींचे शिक्षण  तिने पूर्ण केले. मात्र, सहा महिन्यांपूर्वी तिचे वडील वारले. त्यामुळे ती  तणावाखाली होती.

वडिलांना ट्यूमर

सविताच्या वडिलांनाही ब्रेन ट्यूमरचा त्रास होता. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर सविताला 18 फेब्रुवाराला त्रास वाढला म्हणून केएलई इस्पितळात दाखल केले. डॉक्टरांनी डोक्याचे स्कॅनिंग केले असता मेंदूत रक्तस्राव झाल्याचे निदान झाले. 19 फेब्रुवारीला डॉक्टरांनी आमच्याशी संपर्क साधून हृदय प्रतिरोपणाबाबत चर्चा केली. डॉक्टरांचा सल्ला आम्ही मान्य केला आणि 20 फेब्रुवारीला सविताचे हृदय वीरगौडाला बसवण्यात आले. पण सविता अजूनही आमच्यातच आहे, असेच आम्हाला वाटते, असे पुष्पा यांचे म्हणणे आहे.
पती व मुलगी आमच्यातून गेल्याने माझे आधारवड हरवले आहेत. दोन मुली शितल हिरेमठ व आरती पाटोळे, जावई सतीश पाटोळे व नातू सौरभ पाटोळे यांचाच सध्या आधार आहे, असेही पुष्पा यांनी सांगितले.