Fri, Apr 26, 2019 04:02होमपेज › Belgaon › उत्तर कर्नाटकाशिवाय स्वस्थ बसणार नाही

उत्तर कर्नाटकाशिवाय स्वस्थ बसणार नाही

Published On: Jul 21 2018 1:30AM | Last Updated: Jul 20 2018 10:08PMबेळगाव : प्रतिनिधी

अखंड कर्नाटकची स्वप्ने पाहत सीमाभागातील मराठी भाषिकांना सतत डिवचण्याचा उपद्व्याप करणार्‍या कानडी संघटनांनी आता कर्नाटकालाच घरचा आहेर दिला आहे. उत्तर कर्नाटकावर अन्याय होत असून विकास खुंटला आहे. यामुळे स्वतंत्र उत्तर कर्नाटकाचे आंदोलन तीव्र करून स्वतंत्र राज्याची घोषणा होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा नारा नेत्यांनी दिला आहे.कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपरोक्त इशारा कर्नाटक सरकारला देण्यात आला. यावेळी उत्तर कर्नाटक कृती समितीचे अशोक पुजारी, भीमाप्पा गडाद, प्रा. टी. टी. मुरकटनाळ, कल्याणराव मुचळुंबी आदी उपस्थित होते.

अशोक पुजारी म्हणाले, बेळगाव येथे उभारण्यात आलेली सुवर्ण विधानसौध केवळ एक शोभेची वास्तू ठरली आहे. याठिकाणी कोणतीही सरकारी कार्यालये नाहीत. सरकार केवळ दहा दिवसाचे अधिवेशन घेण्याचे नाटक करते. यापैकी केवळ दोन दिवस खर्‍या अर्थाने कामकाज चालते. उर्वरित दिवस केवळ मनोरंजनात अधिकारी व नेते वेळ घालवितात. सुवर्ण सौधमुळे या भागातील जनतेच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, मागील पाच वर्षात सार्‍या आकांक्षा फोल ठरल्या आहेत. यामुळे उत्तर कर्नाटक विकासाचा दावा फोल ठरला आहे.

नुकताच सादर झालेल्या अर्थसंकल्पात 90 टक्के निधीची तरतूद दक्षिण कर्नाटकसाठी तर 10 टक्के निधीची तरतूद हैद्राबाद कर्नाटक व उत्तर कर्नाटकसाठी केली आहे. हा अन्याय आहे. विकासातील हा फरक स्पष्ट करण्यासाठी सरकारने श्‍वेतपत्रिका जाहीर करावी, अशीही यावेळी मागणी करण्यात आली.31 रोजी सुवर्ण विधानसौधसमोर उत्तर कर्नाटकातील मठाधीश आंदोलन करणार आहेत. यामध्ये शेतकरी संघटना, कानडी संघटना, लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. उत्तर कर्नाटकाला न्याय मिळाल्याशिवाय आता आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असाही इशारा यावेळी देण्यात आला.