होमपेज › Belgaon › ‘उत्तर कर्नाटक’ आज बंद

‘उत्तर कर्नाटक’ आज बंद

Published On: Aug 02 2018 1:55AM | Last Updated: Aug 02 2018 1:55AMबेळगाव, हुबळी : प्रतिनिधी

विकासकामांसह प्रत्येक बाबतीत दक्षिण बंगळूर-म्हैसूरच्या तुलनेत नेहमीच उत्तर कर्नाटकावर अन्याय होत असल्याच्या निषेधार्थ  स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी उत्तर कर्नाटक आंदोलन समितीने गुरुवारी 2 ऑगस्ट रोजी बंदची हाक दिली आहे.  तथापि, बंदसाठी जिल्हा प्रशासनाने शाळांना सुटी किंवा बससेवा बंद राहतील, अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. परिणामी, शाळा तसेच बससेवा सुरू राहील.

उत्तर कर्नाटक शेतकरी संघटनेसह  25 संघटनांंनी बंदला पाठिंबा दिला आहे. उत्तर कर्नाटकातील तेरा जिल्ह्यांत बंद पाळला जाईल. आंदोलन समितीमध्ये फूट पडलेली नाही. काही जणांकडून तशा अफवा पसरवल्या जात आहेत, अशी माहिती शेतकरी संघाचे अध्यक्ष बसवराज करिगार यांनी पत्रकार परिषदेत दिली.  प्राण गेले तरी लढा देणार असल्याचे ते म्हणाले. बेळगाव, हुबळी-धारवाड, हावेरीमध्ये बंदला पूर्ण पाठिंबा मिळणार यात संशय नाही, असा दावा त्यांनी केला. 

मंगळवारी 31 जुलै रोजी मठाधीशांसह काही संघटनांनी बेळगावातील सुवर्णसौधसमोर केलेल्या सांकेतिक धरणे आंदोलनानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी तीन प्रमुख कार्यालये सुवर्णसौधमध्ये स्थलांतरित करण्याची ग्वाही दिली. पुढील आठवड्यापासून प्रत्येक जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा करण्याचे जाहीर केले. त्यामुळे 2 ऑगस्ट रोजी बंदचे आवाहन मागे घेणार का, असा प्रश्‍न संघटनांना विचारण्यात येत होता. पण, बंद मागे घेण्याचा कोणताच विचार नसल्याचे आंदोलन समितीने म्हटले आहे.

कोणत्याही प्रकारच्या राजकीय लाभासाठी आंदोलन छेडण्यात आलेले नाही. कुणीही आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करू नये. उत्तर कर्नाटकातील लोकांवर गेल्या 62 वर्षांपासून अन्याय होत आहे. या भागाचा आतापर्यंत सर्वांगीण विकास होणे गरजेचे होते. मात्र, प्रत्येक सरकारावेळी दुर्लक्षच झाले. आता लढ्याचा पर्याय शोधण्यात आला आहे. काही संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही. त्यांना उत्तर कर्नाटकाचा विकास व्हावा, असे वाटत नसल्यानेच ते मागे हटल्याचा आरोप करिगार यांनी केला.

बेळगावला कर्नाटकची द्वितीय राजधानी बनवणारः मुख्यमंत्री

हुबळी : उत्तर कर्नाटककडे दुर्लक्ष होत असल्याच्या आरोपांचे खंडन करताना मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी बेळगावला दुसर्‍या राजधानीचा दर्जा देण्याचा तसेच काही सरकारी आस्थापने बेळगावला हलवण्याचा प्रस्ताव मांडला आहे.

माझ्या नंतरच्या सरकारांनी या प्रस्तावाचा विचार केला नाही. परंतु, आता मी पुन्हा या प्रस्तावाचा व तो अमलात आणता येईल का, याचा विचार करत आहे’, असे कुमारस्वामी म्हणाले. ‘छोट्या-मोठ्या कामासाठी कलबुर्गी, धारवाड, हुबळी येथील  लोकांचा बंगळूरला जाण्याचा त्रास वाचावा, यासाठी बेळगावमध्ये काही शासकीय आस्थापनेे हलविण्याचा प्रस्ताव मांडल्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी म्हणाले.