Sun, Jul 21, 2019 00:21होमपेज › Belgaon › स्वतंत्र राज्यासाठी आज सुवर्णसौधसमोर ध्वज फडकवणार

स्वतंत्र राज्यासाठी आज सुवर्णसौधसमोर ध्वज फडकवणार

Published On: Jul 31 2018 1:30AM | Last Updated: Jul 30 2018 11:25PMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटकाच्या स्थापनेपासून सध्याच्या आघाडी सरकारपर्यंत नेहमीच उत्तर कर्नाटकावर अन्याय झाला आहे. त्या विरोधात मंगळवारी (दि. 31) सुवर्णसौधसमोर मठाधीश आणि विविध संघटनांकडून सांकेतिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचवेळी स्वतंत्र उत्तर कर्नाटकाचा ध्वज फडकविण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलन समितीचे नेते नागेश गोळशेट्टी आणि अडिवेश इटगी यांनी दिला आहे. 

सांकेतिक धरणे धरल्यानंतर मठाधीशांच्या परवानगीनुसार वेगळ्या राज्याचा ध्वज फडकवला जाईल. यामुळे या लढ्याला बळ मिळेल, असे मत उत्तर कर्नाटक स्वतंत्र राज्य आंदोलन समितीने व्यक्‍त केले आहे. 

आता तरी सरकारने जागे होण्याची वेळ आली आहे. उत्तर कर्नाटकाच्या सर्वच विभागांमध्ये विकास कुंठीत झाला आहे.  अनुदान मंजूर करण्यात दरवेळी अन्याय करण्यात आला आहे. या भागातील 13 जिल्ह्यांमध्ये निष्पक्षपणे आंदोलन हाती घेण्यात येत आहे. याला विविध संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी मुधोळमध्ये स्वतंत्र राज्याचा ध्वज फडकविण्यात आला होता. त्याद्वारे सरकारला सडेतोड इशारा देण्यात आला होता. आता सुवर्णसौधसमोर ध्वज फडकावण्यात येईल. उत्तर कर्नाटकावरील अन्याय दूर होईपर्यंत किंवा यावर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मोळकाल्मुरूचे आमदार श्रीरामुलू यांनी उत्तर कर्नाटक वेगळ्या राज्याचे नेतृत्व करण्याची तयारी दशर्ववली आहे. पण, उत्तर कर्नाटकात अनेक नेत्यांमध्ये नेतृत्वाची क्षमता आहे. स्थानिक नेते याकरिता आंदोलन करत आहेत. त्यामुळे इतर नेत्यांचे नेतृत्व आता नको, असे मत आंदोलकांनी व्यक्‍त केले.

मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांवर भडकले

मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी उत्तर कर्नाटकाच्या बाबतीत प्रसारमाध्यमांकडून आगीत तेल ओतण्याचे काम होत असल्याची टीका केली आहे. उत्तर कर्नाटकाविरोधात आपण काहीच बोललो नसताना वारंवार याबाबतचे वृत्त प्रसारित केले जात आहे. टीव्ही वाहिन्यांवर याबाबतच्या चर्चासत्राचे आयोजन करून आपल्याला लक्ष्य बनविले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.