Thu, Aug 22, 2019 08:10होमपेज › Belgaon › उत्तर कर्नाटक बंद संमिश्र

उत्तर कर्नाटक बंद संमिश्र

Published On: Aug 03 2018 1:33AM | Last Updated: Aug 03 2018 12:11AMबेळगाव/ हुबळी : प्रतिनिधी

उत्तर कर्नाटक शेतकरी संघाने गुरुवारी (दि. 2) पुकारलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. या भागात विविध संघटनांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. काही ठिकाणी बंद पाळण्यात आला तर उर्वरित ठिकाणी धरणे धरून सरकारी धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.

बंदचे गंभीर परिणाम दिसून आले नाहीत. सकाळी काही काळ वाहतूक बंद होती. शाळा, महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू होते. सरकारी कार्यालये नेहमीप्रमाणे सुरू होती. पण, बंदच्या भीतीमुळे अनेकांनी शहरात येण्याचे टाळले. सरकारी कार्यालयांत गर्दीचे प्रमाण कमी होते. ग्रामीण भागातील लोकांनी शहरात येण्याचे टाळल्याने शहरातील भाजी विक्रेते व इतर व्यापार्‍यांना फटका बसला. 
बुधवारी सायंकाळी उशिरा उत्तर कर्नाटक आंदोलन समितीने बंद मागे घेऊन केवळ आंदोलन करण्याचे सांगितल्याने याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. 

हुबळी येथे राणी चन्‍नम्मा चौकात शेतकर्‍यांसह विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. शहरातून मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले. अनुचित प्रकारांवर नियंत्रणासाठी मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले होते. याप्रसंगी विद्याश्रम हुबळीचे षडाक्षरी स्वामींनी सरकारकडून उत्तर कर्नाटकावर विकासाच्याब बाबतीत अन्याय झाल्याचा आरोप केला. याआधी उत्तर कर्नाटक आंदोलन समितीचे सोमशेखर कोथंबरी यांनी आंदोलनात सक्रीय भाग घेतला होता. अनेक संघटनांनी बंदला पाठिंबा दिला होता. असे असतानाही त्यांनी सर्वांना विश्‍वासात घेतले नाही. बंदच्या आदल्या दिवशी माघार घेणे योग्य नाही. त्यांचा निर्णय एकतर्फी असल्याची टीका स्वामींनी केली.

31 जुलै रोजी बेळगावातील सुवर्णसौधसमोर मठाधीशांसह विविध संघटनांनी सांकेतिक धरणे धरले होते. यानंतर सतर्क झालेल्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ तीन सरकारी कार्यालये बेळगावात स्थलांतरित करण्याचे आणि प्रत्येक जिल्ह्यात दोन दिवसाचा दौरा करण्याची ग्वाही दिली. काही मागण्या आधीच मान्य करण्यात आल्याने गुरूवारच्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

याविषयी बोलताना उपमुख्यमंत्री डॉ. जी.परमेश्‍वर यांनी बंद अयशस्वी झाल्याचे सांगितले. सरकारने राज्य फोडण्याचा प्रयत्न कधीच केलेला नाही. राज्याच्या सर्वच भागाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले.