होमपेज › Belgaon › स्वच्छ भारत अभियानात निपाणी शहर पडले पिछाडीवर

स्वच्छ भारत अभियानात निपाणी शहर पडले पिछाडीवर

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 10:43PMनिपाणी : प्रतिनिधी

केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्वच्छ भारत योजनेंतर्गत देशातील स्वच्छ शहरांच्या यादीत निपाणी शहराचा दक्षिण भारतात तब्बल 350 वा क्रमांक आला आहे. तर कर्नाटकात 82 वा क्रमांक आल्याने निपाणी स्वच्छतेच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचा शिक्‍कामोर्तब झाला आहे.

निपाणीपेक्षा गोकाक, चिकोडी, रायबाग, सदलगा व खानापूर शहरांनी आपले रँकींग वाढविले आहे. निपाणी शहर हे बेेळगाव जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाचे शहर आहे. शहरात घरोघरी घंटा गाडीद्वारे कचरा उचल केला जातो. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट योजनेतून कचर्‍यापासून खतनिर्मिती करण्यासाठी पट्टणकुडी हद्दीत पालिकेने जागा घेऊन तेथे खत निर्मितीही चालविली आहे. असे असताना दक्षिण भारतात 1150 नगरपालिकेमधून निपाणीचा स्वच्छतेेच्या बाबतीत 350 वा क्रमांक लागला आहे. निपाणी शहराच्यादृष्टीने ही लाजिरवाणी गोष्ट आहे.

यासंदर्भात पालिकेचे आरोग्य निरीक्षक विवेक बन्ने म्हणाले, निपाणीत 4 जानेवारीपासून 5 दिवस स्वच्छ भारत योजनेंतर्गत सर्व्हेक्षण झाले होते. शहरात घरोघरी कचरा गोळा केला जातो. तसा नजीकच्या शहरात केला जात नाही. निपाणी शहर हे हागणदारीमुक्‍त असल्याचे प्रमाणपत्र हौसिंग अ‍ॅन्ड अर्बन अफेअर्स मिनिस्ट्रीकडून 2 फेब्रुवारी 2018 रोजी स्वच्छ भारत मिशनचे  साहाय्यक सचिव व मिशन डायरेक्टर विनोदकुमार जिंदाल यांनी पालिकेला दिले आहे. असे प्रमाणपत्र मिळाले नसलेल्या शहरांचा स्वच्छ शहरांच्या यादीत वरचा क्रमांक आला असल्याचे सांगितले.काही ठिकाणी कचरा उकिरड्यात टाकला जातो. त्यामुळे हा सर्व्हे कोणत्या निकषांवर केला गेला. निपाणी शहराचे नाव पिछाडीवर कसे पडले, असा सवाल आहे. कर्नाटक राज्यात 300 नगरपालिकांमध्ये मात्र  निपाणीचा 82 वा क्रमांक आला असल्याने थोडी समाधानाची बाब आहे. निपाणी पालिकेने शहरात वैयक्‍तिक शौचालयांना प्राधान्य देऊनही स्वच्छ भारतमध्ये टक्का कसा घसरला, याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.