Sat, Apr 20, 2019 17:53होमपेज › Belgaon › ‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ वर  तिसरा डोळा

‘नो हेल्मेट, नो पेट्रोल’ वर  तिसरा डोळा

Published On: Mar 03 2018 1:52AM | Last Updated: Mar 02 2018 11:29PMबेळगाव : प्रतिनिधी

हेल्मेटसक्ती करूनही पळवाटा शोधल्या जात असल्याने पोलिस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार दि. 21 फेब्रुवारीपासून शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल अभियान राबविले. या अभियानास तीन-चार दिवस प्रत्येक पेट्रोल पंपावर दिलेला पोलिस बंदोबस्त आता गुल झाला आहे. यावर उपाय म्हणून पंपावर असलेल्या सीसीटीव्ही चित्रणावरून कारवाई करणार असल्याचे पोलिस प्रशासनाने सांगितले. 

मंगळवार 20 रोजी पोलिस उपायुक्त लाटकर, वाहतूक उपायुक्त महानिंग नंदगावी, वाहतूक एसीपी महांतय्या मुप्पीनमठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पेट्रोल पंप मालकांची बैठक घेऊन ‘नो हेल्मेट नो पेट्रोल’ अभियान जाहीर केले. यासाठी शहरातील प्रत्येक पंपावर एक पोलिस दिला होता. पहिल्या दोन-तीन दिवसात आयुक्त डॉ. डी. सी. राजाप्पा याने काही पंपावर भेट देऊन पाहणी केली. राजप्पा यांनीही हेल्मेट नसलेल्या दुचाकीस्वारावर सीसी टीव्ही कॅमेर्‍याच्या माध्यमातून कडक कारवाई करू, असे सांगितले. मात्र सक्तीबाबत शिथिलता दिसते.

काही पंपांवर पहिल्या दोन दिवसात हेल्मेटसक्तीचे निर्बंध लादले होते, तसे चित्र आता नाही. पंपावरील बंदोबस्त हटविल्याने कर्मचारीही ग्राहकाबरोबर हुज्जत घालण्यापेक्षा पेट्रोल घातलेले बरे, असे मानतात. पोलिसांनी हेल्मेटसक्तीबाबत गांधीगिरी केली. नंतर दंडात्मक कारवाईस प्रारंभ केला. यातूनही यश मिळत नसल्यामुळे पंपावर नो हेल्मेट नो पेट्रोल अभियान चालवले. या ठिकाणचा बंदोबस्त काढून भिस्त सीसीटीव्हीवर ठेवली आहे.

धुलिवंदनानिमित्त अघोषित हेल्मेटमुक्ती 

आयुक्त राजाप्पा, उपायुक्त लाटकर यांनी होळीच्या पार्श्‍वभूमीवर शांतता बैठक घेतली होती. यात रंगोत्सवात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाईचा इशारा दिला होता. मात्र बहुतांश ठिकाणी शुक्रवारी अघोषित हेल्मेटमुक्तीसारखी परिस्थिती दिसली. 

महाविद्यालयात जागृती कधी?

वाहतूक पोलिस उपायुक्त महानिंग नंदगावी यांनी सक्तीच्या पहिल्या दिवशीच नो हेल्मेट नो पेट्रोलबाबत महाविद्यालयात जागृती करणार असल्याचे सांगितले होते. हेल्मेटसक्तीला 10 दिवस होऊन गेले तरी अशी हालचाल दिसत नाही. पोलिस प्रशासनाने कारवाईत सातत्य राखावे आणि इतर उपाययोजना आखाव्यात, अशी मागणी होत आहे.