Mon, Apr 22, 2019 15:41होमपेज › Belgaon › इंधन, वीज दरवाढ नको!

इंधन, वीज दरवाढ नको!

Published On: Jul 12 2018 1:40AM | Last Updated: Jul 12 2018 12:32AMबंगळूर : प्रतिनिधी

कृषी कर्जमाफी करण्यासाठी इंधन, वीज दरवाढ करण्यात आली आहे. ती तत्काळ मागे घ्यावी, अन्यथा काँग्रेसला त्याचा फटका बसेल. आगामी निवडणुकीत जनता पक्षाला धडा शिकवेल, असा इशारा बुधवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत देण्यात आला. दरम्यान,  काँग्रेसने  अर्थसंकल्पातील निर्णयावर घेतलेल्या ‘यू टर्न’ची चर्चा सुरू आहे.

विविध सरकारी खात्यांमध्ये कर वसुली योग्यरित्या होत नाही. गळती लागली आहे. त्यावर नियंत्रण ठेवून कर्जमाफीसाठी लागणारा आवश्यक निधी संग्रहित करता येणे शक्य आहे. पण, मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी सामान्य जनतेवर बोजा पडणारी इंधन, वीज दरवाढ केली आहे. याचा बोजा सामान्यांवर पडणार आहे. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सामान्य जनतेवर दिवसेंदिवस आर्थिक बोजा वाढत असल्याचा आरोप आपण करत आहोत. अशावेळी  आघाडी सरकार असताना विविध प्रकारची दरवाढ करणे योग्य नाही. मद्याच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. मद्याच्या दरात कितीही वाढ केली तरी त्याची विक्री थांबत नाही. पण, भरमसाट दरवाढीचा परिणाम गरीब, मध्यमवर्गावर होणार आहे. लोक मद्य प्राशन करतात म्हणून त्यांच्यावर करवाढीचा बोजा टाकणे कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न आमदारांनी वरिष्ठांना विचारला.

मंत्री एच. के. पाटील यांनी समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री परमेश्‍वर यांना कर्जमाफी आणि उत्तर कर्नाटकावर झालेल्या अन्यायाबद्दल सविस्तर पत्र लिहिले आहे. बैठकीत आमदारांनी याबाबतचा विषय मांडला. त्यावर दीर्घ चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना एच. के. पाटील म्हणाले, आपण लिहिलेल्या पत्राबाबत चर्चा झाली. इंधन दरवाढ आणि इतर विषयांवर आमदारांनी मते मांडली. डी. के. शिवकुमार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीविषयी विचार विनिमय करण्यात आल्याचे सांगितले. भाजप आमदार गुळीहट्टी शेखर यांनी आपली भेट घेतली हे खरे आहे. सौजन्यादाखल त्यांनी भेट घेतली. यामागे विशेष अर्थ लावण्याचे कारण नसल्याचे शिवकुमार म्हणाले.

मुख्यमंत्री कुमारस्वामींनी वीज दरवाढ केली आहे. शिवाय अन्नभाग्य योजनेतील अन्नधान्याच्या प्रमाणात कपात केली आहे. याचा परिणाम सामान्य जनतेवर होणार आहे. गत काँग्रेस सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अनेक लोकप्रिय योजना जारी केल्या. त्यामुळे पुन्हा काँग्रेस सत्तेवर येण्याचा विश्‍वास होता. मात्र, भाजपने केलेला अपप्रचार आणि कटामुळे काँग्रेसला फटका बसल्याचे सिद्धरामय्या म्हणाले.

सिद्धरामय्यांचा ‘यू टर्न’

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर इंधन, वीज दरवाढीचे समर्थन करणारे समन्वय समितीचे अध्यक्ष सिद्धरामय्या यांनी आता ‘यू टर्न’ घेतला आहे. पेट्रोल, डिझेलचे दर वाढले तर महागाई वाढणार असून सामान्य जनतेवर याचा बोजा पडणार असल्याचे ते म्हणाले. नूतन प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडुराव यांच्या पदग्रहण समारंभावेळी ते बोलत होते.