Sun, Mar 24, 2019 16:43होमपेज › Belgaon › निधीसाठी नितीन गडकरींना भेटणार

निधीसाठी नितीन गडकरींना भेटणार

Published On: Jun 18 2018 1:09AM | Last Updated: Jun 17 2018 11:50PMबेळगाव : प्रतिनिधी

राज्यातील रस्ता कामासाठी केंद्राने 12 हजार कोटी रुपयाच्या अनुदानाला मंजुरी दिली आहे. मात्र राज्याला केवळ 500 कोटी रुपये मिळतात. उर्वरित रक्‍कम मिळाल्यास राज्यातील रस्ताकामे करणे सुलभ ठरेल. यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रेवण्णा यांनी दिली. जि. पं. कार्यालयात रविवारी बेळगाव, बागलकोट व विजापूर जिल्ह्याची रस्ता विकास आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी उपरोक्त माहिती मंत्री रेवण्णा यांनी दिली.

खा. प्रकाश हुक्केरी म्हणाले, केंद्राने 12 हजार कोटीच्या निधीला मंजुरी दिली आहे. मात्र राज्याच्या पदरात केवळ 500 कोटी इतका अत्यल्प निधी मिळतो. यामुळे राज्यातील रस्ताकामांना पुरेसा निधी मिळत नाही. यासाठी प्रयत्न करावेत खा. सुरेश अंगडी यांनीही उपरोक्त सूचनेला पाठिंबा देऊन केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेण्याचा प्रस्ताव मांडला.यावर मंत्री रेवण्णा यांनी बंगळूर येथे लवकरच राज्यातील खासदारांची बैठक घेऊन केंद्रीय निधीसाठी सर्वक्षीय शिष्टमंडळ नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

मंत्री रेवण्णा म्हणाले, पावसामुळे रस्त्यांची फार मोठी हानी झालेली आहे. रस्त्यातील खड्डे प्रामुख्याने बुजविण्याचे आदेश देण्यात आले. त्यानंतर रस्ता कामांना सुरूवात करण्यात येईल.खड्डे बुजविताना निधीच्या मंजुरीकडे पाहू नका. उपलब्ध निधी आधी खड्डे दुरुस्तीसाठी वापरा. यामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, याची खबरदारी घ्या, असेही सुचविले.

बेळगाव, बागलकोट, विजापूर जिल्ह्यात पावसामुळे रस्ता, पूल आणि सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला.आ. लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, ग्रामीण मतदारसंघातील अनेक गावचे रस्ते खराब झाले आहेत. यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून सरकारने अनुदान मंजूर करावे.

यावर मंत्री रेवण्णा म्हणाले, रस्ताकामाचा आराखडा तयार करून पाठवावा. सरकारकडून त्याला मंजुरी देण्यात येईल. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन जिल्ह्यातील एकूण समस्या मांडाव्यात, अशी सूचना अभियंत्यांना दिली.

आ. अनिल बेनके, आ. दुर्योधन ऐहोळे, आ. महादेवप्पा यादवाड यांनी मागण्या मांडल्या. बैठकीला आ. गणेश हुक्केरी, आ. विवेक पाटील, जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबळे, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी आर. रामचंद्रन, पोलिस आयुक्त डॉ. राजप्पा, जिल्हा पोलिसप्रमुख सुधीरकुमार रेड्डी, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. एल. बी. बुद्याप्पा उपस्थित होते.