Thu, Jul 18, 2019 00:37होमपेज › Belgaon › निपाणी अग्‍निशमन विभागामुळे वाचले युवकाचे प्राण

निपाणी अग्‍निशमन विभागामुळे वाचले युवकाचे प्राण

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 10:49PM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

सुमारे 30 फूट खोल विहिरीत उडी घेतलेल्या युवकाला निपाणी अग्निशमन विभागाने वेळीच धाव घेऊन बाहेर काढले. ही घटना शुक्रवारी दुपारी 12.30 च्या सुमारास शिंदेनगरनजीकच्या कोडणी हद्दीत घडली. अशोक भिमाप्पा दळवाई (वय 35, रा. गोकाक) असे त्या युवकाचे नाव आहे. कोडणी हद्दीच्या परिसरात पाच, सहा कुटुंबीयांची घरे असून दुपारी 12 च्या सुमारास एक युवक अचानक वस्तीवर आला. दारूच्या नशेत असलेल्या युवकाने समोरील विहिरीत उडी घेतली. नागरिकांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी विहिरीकडे धाव घेतली. विहिरीत उतरण्यासाठी कशाचाही आधार नसल्याने नागरिकांचीही भंबेरी उडली. दरम्यान यातील काहींनी शहर पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांनी अग्निशमन विभागाला याची कल्पना दिली. अग्निशमन विभागाचे निरीक्षक ए. बी. नदाफ, कर्मचारी ए. डी. मुल्ला, बी. सी. पुजारी, उदय पट्टण, बसू दोनवाडे, एल.आय.शिरगावे, रमेश चिवटे, विजयकुमार देवर्षी, अनिल जमदाडे यांनी घटनास्थळाकडे धाव घेत सदर युवकाला धाडसाने बाहेर काढले.  यावेळी तो जखमी झाल्याने त्याच्यावर सरकारी म.गांधी रुग्णालयात उपचार करून त्याला घरच्यांच्या हवाली केले. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी केली होती.