Wed, May 22, 2019 22:47होमपेज › Belgaon › ग्रुप अ‍ॅडमिन आहात?... मग सावधान !

ग्रुप अ‍ॅडमिन आहात?... मग सावधान !

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 8:29PM

बुकमार्क करा

निपाणी : महादेव बन्ने

व्हॉट्सअ‍ॅपवर आक्षेपार्ह मजकूर टाकल्याने धार्मिक सौहार्द बिघडेल, अशी घटना निपाणीत घडली. यामुळे ग्रुप अ‍ॅडमिन असणार्‍यांनो सावधान. सोशल मीडिया साईट्स जितक्या चांगल्या तेवढ्यात धोकादायकही आहेत. ग्रुप अ‍ॅडमिनला भविष्यात उद्भवणार्‍या परिणामांची पुसटशी कल्पना नसेल अथवा कायद्याचे ज्ञान नसेल तर तो गोत्यात येऊ शकतो. ‘4-जी’ युगात व्हॉट्सअ‍ॅप हा बहुतांश स्मार्टफोन युजर्सच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाला आहे. याद्वारे होणार्‍या दुरुपयोगावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी गु्रपच्या अ‍ॅडमिननी ठेवली पाहिजे. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक ग्रुप कार्यरत आहेत. यातील काही ग्रुप्सवरून आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्रे, व्हीडीओ टाकण्याचे प्रमाण वाढले आहे.

यातून जातीय दंगली, सामाजिक तेढ वाढणे असे प्रकार होण्याचा धोका आहे. यामुळे ग्रुपमधील सदस्य नेमका कोणता मजकूर टाकत आहे, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अ‍ॅडमिनची आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर खोड म्हणून चुकीचे मेसेज टाकण्याचे प्रमाण वाढत आहे. एखाद्याचा खोडसाळपणा भीषण ठरू शकतो. यामुळे यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. याकरिता तंत्रज्ञानाचा वापर करून ‘फिल्टर्स’ लावणे शक्य आहे. व्हॉट्सअ‍ॅप वापरणार्‍यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालल्याने पोलिसांनी जनजागृतीवर अधिक भर दिला पाहिजे. तक्रारकर्त्यांचे नाव गोपनीय ठेवून ऑनलाईन तक्रारी स्वीकारण्यासाठी विशेष तक्रार सेल स्थापन करणे गरजेचे आहे.

व्हॉट्सअ‍ॅपचा दुरुपयोग करून सामाजिक एकतेला धक्का पोहोचविण्याचे प्रयत्न होऊ शकतात. व्हॉट्सअ‍ॅप हे ‘मोबाईल टू मोबाईल’ चालते. यामुळे यावर लक्ष ठेवणे कठीण असते. कोणी तक्रार दाखल केली तर संबंधित अ‍ॅडमिन अथवा त्या ग्रुपवर मेसेज सोडणार्‍यावर कारवाई होऊ शकते.  पोलिसांनी जाहीर केल्यानुसार आक्षेपार्ह मजकूर, फोटो, व्हीडीओ पुढे फॉरवर्ड करणे, पोस्ट करणे, लाईक करणे, शेअर करणे, कॉमेंट करणे, प्रसारित करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. असे करणार्‍यावर भारतीय दंड विधानच्या कलम 295 अ व ब नुसार कारवाई होऊ शकते. यामध्ये 3 वर्षापर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.
एखाद्या ग्रुपमधील सदस्याने असा आक्षेपार्ह मजकूर टाकला असेल तर गु्रप अ‍ॅडमिनने यावर काय केले, हे पाहिले जाईल. ग्रुप अ‍ॅडमिनने आवश्यक ती काळजी घेतली असेल तर त्याच्यावर गुन्हेगारी कलमानुसार कारवाई होणार नाही. मात्र संबंधित मेसेज अथवा फोटो टाकणार्‍यावर कारवाई होईल.