Fri, Jul 19, 2019 05:35होमपेज › Belgaon › मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांचे आता अपडेट रेकॉर्ड

मोस्ट वॉन्टेड गुन्हेगारांचे आता अपडेट रेकॉर्ड

Published On: Dec 28 2017 1:34AM | Last Updated: Dec 27 2017 10:28PM

बुकमार्क करा
निपाणी  : मधुकर पाटील 

निपाणी परिसरात वाढती लूटमार, घरफोडीच्या घटनांनी पोलिस यंत्रणा हबकून गेली आहे. या पार्श्‍वभूमीवर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून अशा घटनांचा बंदोबस्त करण्यासाठी मोस्ट वॉन्टेड  गुन्हेगारांचे अपडेट रेकॉर्ड करण्याच्या कामात यंत्रणा गुंतली आहे. वाढती गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांनी ही उपाययोजना केली आहे. अशा गुन्हेगारांचे रेकॉर्ड तपासून घटनेचा तपास लावण्यात पोलिसांना यश येणार आहे. चार महिन्यात लूटमारीच्या पाच तर घरफोडीच्या तीन घडल्या. यामधून लुटारुंनी लाखो रु.चा मुद्देमाल लांबविला आहे. ठराविक काळातच अशा घटना घडत असल्याने पोलिस यंत्रणाही हैराण आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे. गुन्हेगारीवर पोलिसांचा वचक राहिला नाही. पोलिस पुढे व चोर मागे अशी परिस्थिती दिसून येते. 

गेल्या तीन-चार वर्षात शहरात अनेक घटनांचा तपास वेळेत लावण्यात पोलिसांनी तातडीने यश येत होते. मात्र दोन वर्षापासून येथे असणार्‍या लोकल क्राईम ब्रँच पथकात कामगारांची वानवा असल्याने हे काम आता स्थानकातील अन्य कामगारांना करावे लागत आहे. यामुळे अनेक घटनांचा तपास रेंगाळत चालला आहे. गतवर्षीपासून भरदिवसा दागिने लुटीच्या घटनांनी डोके वर काढले असून यामागे इराणी टोळीचा हात असल्याचा संशय बळावला आहे. यामध्ये महिलांचाही समावेश आहे. अशा टोळींकडूनच दिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने लांबविण्याच्या घटना घडत आहेत. यामध्ये आठवडी गुरुवार बाजारादिवशी टोळीने धुमाकूळ सुरू ठेवला आहे. 

गेल्या वर्षभरात या टोळीने हजारो मोबाईल व अनेकांचे खिसे व पाकिटे मारून लाखो रुपये लांबविले आहेत. पोलिसांना अशा घटनांचा व गुन्हेगारांचा तपास लावणे  मनुष्यबळाअभावी अडचणीचे ठरत आहे. प्रत्येक स्थानकांतर्गत मोस्ट वॉन्टेड (रेकॉर्डवरील) गुन्हेगारांची माहिती जमविण्याचे काम  युध्दपातळीवर सुरू आहे.  तीन स्थानकांतर्गत सुमारे 100 हून अधिक गुन्हेगारांचा समावेश आहे. यांच्या माध्यमातूनच वरील घटनांचा तपास लावण्यात पोलिसांना मदतीचे ठरत आहे. पंधरा  दिवसापूर्वी आठवडी बाजारादिवशी मोबाईल व पाकिटे  लांबविणार्‍या चोरट्याला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. त्याच्या माध्यमातूनच  पोलिस वरील घटनांच्या तपासात गुंतली आहे.