Thu, Feb 21, 2019 09:42होमपेज › Belgaon › सुभाष जोशींची संक्रांतीची डेडलाईन

सुभाष जोशींची संक्रांतीची डेडलाईन

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हालसिध्दनाथ साखर कारखान्याचे चेअरमन माजी आ. प्रा. सुभाष जोशी आगामी राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. संक्रांतीलाच आपला गोडवा कोणाला, हे जाहीर करणार असल्याचे सुतोवाच कुर्ली येथे शनिवारी रात्री झालेल्या सत्कारप्रसंगी जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आ. काकासाहेब पाटील होते.

कुर्ली ग्रामस्थ व शेतकरी यांच्यावतीने प्रा. जोशी यांना सहकाररत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल व हालशुगरने राज्यात सर्वाधिक प्रतिटन 3151 इतका विक्रमी ऊस दर दिल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम हालसिध्दनाथ मंदिरात झाला.

स्वागत व प्रास्ताविक के. डी. पाटील यांनी केले.प्रास्ताविकात पाटील यांनी काकासाहेब पाटील यांचा वाढदिवस असून या कार्यक्रमदिनी हा अमृतयोग जुळून आल्याचे सांगितले. त्यानुसार प्रा. जोशी व काकासाहेब पाटील यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 

प्रा. जोशी म्हणाले, श्री हालसिध्दनाथांच्या कृपेने कारखान्याने उच्चांकी दर 3151 रु. इतका दिला. यंदा उसाचे गाळप 15 मार्चपर्यंत चालणार असून या भागातील सर्व सभासदांच्या उसाची उचल केली जाईल. मला मिळालेला सहकाररत्न पुरस्कार माझा नसून तो सर्वसामान्यांचा व शेतकर्‍यांचा आहे. ते म्हणाले, 14 जानेवारीनंतर निवडणूक व राजकीय भूमिकेबाबत निर्णय घेणार आहे.

काकासाहेब पाटील म्हणाले, हालशुगरने दिलेला दर कौतुकास्पद ठरला आहे. प्रा. जोशींनी सहकारात दिलेले योगदान लक्षात राज्य सरकारने त्यांना सहकाररत्न पुरस्कार दिल्याने या पुरस्काराची उंची वाढली आहे. नगरसेवक जुबेर बागवान, पी. टी. कांबळे, मारुती कोळेकर, जि. पं. सदस्य जयवंत कांबळे, हालशुगरचे संचालक पप्पू पाटील यांनी विचार मांडले. माजी संचालक राजू पाटील, बाबुराव मगदूम, ग्रा. पं.अध्यक्ष बंडा पाटील, सदस्य अमर शिंत्रे, अरुण निकाडे, आर. आर. पाटील, संतोष पाटील, आनंदा चौगुले, शिवाजी नार्वेकर, नितीन नेपीरे, पुंडलिक भेंडुगळे, भगवान पाटील, बाजीराव पाटील, बजरंग पाटील, सुरेश पाटील, कृष्णात निकाडे, अण्णासो माळी, कुर्ली, भाटनांगनुर,आप्पाचीवाडी, सौंदलगा, यमगर्णी येथील उस उत्पादक ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन कुमार माळी यांनी केले. कृष्णात हेरवाडे यांनी आभार मानले.