Sun, Aug 25, 2019 08:40होमपेज › Belgaon › सौंदलग्याचा कांदा बंगळूर बाजारपेठेत

सौंदलग्याचा कांदा बंगळूर बाजारपेठेत

Published On: Jan 13 2018 1:11AM | Last Updated: Jan 12 2018 7:25PM

बुकमार्क करा
निपाणी : मधुकर पाटील

निपाणी परिसरातील सौंदलगा येथे यंदाच्या पहिल्या टप्यातील रब्बी हंगामातील गारवा जातीच्या कांदा पीक काढणीला सुरूवात झाली. यामुळे शिवारे फुलून गेली आहेत. दरम्यान गेल्या चार, आठ दिवसांपूर्वी काढलेला कांदा बुधवारी बंगळूरच्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल होवून या हंगामातील या पिकाचा पहिलाच सौदा झाला. पहिल्या सौद्यावेळी 25 ते 44  रू.किलो इतका दर शेतकर्‍यांना मिळाला आहे. असे असले तरी एकरी उत्पादनात कमालीची घट झाली असून चांगल्या दराने उत्पादक मात्र सुखावला आहे. दरम्यान हाच दर येत्या 31 जानेवारीपर्यंत टिकुन राहिल, असे मत बंगळुरातील व्यापारी रवी यांनी व्यक्त केले.

गेल्या वर्षभरापासून स्थानिकसह बंगळूर बाजारपेठेत या पिकाचा दर 10 ते 15 रूपयापर्यंत स्थिर राहिला. सध्या या पिकाचा दर 40 रूपयांवर गेला आहे. असे असले तरी ज्यावेळी उत्पादन निघते त्याचवेळी व्यापारीवर्गाकडून दरासाठी जुगार खेळला जातो. याचा फटका उत्पादक शेतकरीवर्गाला बसतो. या पिकाच्या काढणीला सध्या जोर आला आहे. असे असले तरी गेल्या ऑक्टोबरपासून झालेल्या एक दोन  पावसासह   पडलेल्या दाट धुक्याचा परिणाम या पिकावर झाल्याने एकरी उत्पादनात घट जाणवत असून माढ्याक्षेत्रावर 7 तर उसातून घेतल्या गेलेल्या पिकाचे 3 ते 4 टनापर्यंत उत्पादन निघत आहे. मुळातच कांदा लावणीवेळी चढ्या दराने तरूची उपलब्धता करून लावणी आटोपल्या आहेत. यात एकरी लावण, रोप, रासायनिक खते, कीटकनाशकांचा वापर, पाण्याचा डोस यासाठी एकरी 60 ते 65 हजार खर्च झाला आहे.

बुधवारी बंगळूर बाजारपेठेत कांदा विक्री करून आलेल्या सौंदलगा येथील संजय पाटील (गलगले), दत्तात्रय शिंदे या शेतकर्‍यांशी संपर्क साधला असता सध्यस्थितीत बाजारपेठेत चित्रदुर्ग, गुलबर्गा, विजापूर व काही प्रमाणात नाशिक परिसरातील कांद्याची आवक आहे. बुधवारच्या सौद्यावेळी 100 ट्रक इतक्या कांदा टकची  बंगळूर  बाजारपेठेत आवक होती. यामध्ये कांद्याच्या प्रतवारीनुसार 25,35,37,38,40  याप्रमाणे किलो इतका दर कांद्याला मिळत  आहे. सध्याचे उत्पादन लक्षात घेता हा दर परवडणारा असला तरी तो पुढे किती दिवस टिकून राहतो यावर सगळे अवलंबून असल्याचे मत एजंट नंदकुमार चव्हाण (सौंदलगा) सांगितले.