Wed, Nov 13, 2019 12:48होमपेज › Belgaon › पीकस्थिती साधल्याने शेतकरी सुखावला

पीकस्थिती साधल्याने शेतकरी सुखावला

Published On: Dec 05 2017 8:39PM | Last Updated: Dec 05 2017 8:39PM

बुकमार्क करा

निपाणी : मधुकर पाटील

शिवारात  रब्बी हंगामात शेतकरीवर्गाने घेतलेल्या कांदा, शाळू, गहू, हरभरा व इतर भाजीपाला पिकांची  वाढ समाधानकारक असून   गुलाबी थंडीमुळे ही पिके तरारली असून शेतकरीवर्ग सुखावला आहे.
सध्या या पिकांच्या आंतरमशागत कामाबरोबरच पिकांना पाणी देणे, कीड नियंत्रणासाठी औषधांची फवारणी करणे, हंगामी ऊसलावण करून  घेण्यासाठी शेतकरीवर्गाची धांदल उडाली आहे. ऊसतोडणी हंगामामुळे शिवारे फुलली आहेत.

ग्रामीण भागात  हेस्कॅामकडून अवंलबिण्यात आलेल्या केवळ तीन तास थ्री फेज वीजपुरवठा धोरणामुळे काही अंशी शेतीकामाचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे एकेका कामासाठी शेतकरीवर्गाचा वेळ खर्ची पडत आहे. गेल्या दोन वर्षात या भागात ऊसक्षेत्रात कमालीची वाढ झाल्याने यंदा शेतकरीवर्गाने बाजारपेठेत तेजीत असणारे कडधान्याचे दर पाहून अशा पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेऊन पारंपारिक पीक पध्दतीला प्राधान्य दिल्याने दुर्मीळ होत चाललेली पीक  पध्दत पुन्हा अस्तित्वात येत आहे.

मुळातच निपाणी परिसर हा तंबाखू, ऊस, कांदा या नगदी पिकांसाठी प्रसिध्द आहे. दोन, तीन वर्षात वर्षांपासून ऊस, कांदा व तंबाखूला चांगला दर  मिळाल्याने या पिकाखालील क्षेत्रात वाढ होत आहे. पाच, सहा वर्षापासून  पारंपरिक पीकपध्दतच बंद करून ठेवल्याने शेतकरीवर्गाला दैनंदिन गरजेसाठी लागणार्‍या गहू, हरभरा, शाळू या कडधान्याची चढ्या दराने खरेदी करावी लागली. दोन वर्षात शेतकरीवर्गाला व्यापारीवर्गाकडून वाईट अनुभव मिळाला आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाने प्राप्त परिस्थितीचा अंदाज घेत पारंपरिक पीकपध्दत अवलंबली आहे. आंतरपीक पध्दतीला प्राधान्य दिले आहे.
सध्या शिवारातील पेरणी झालेल्या शाळू, गहू व हरभरा पिकावर मावा, जिगी व अन्य प्रकारच्या किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पहाटेच शेतकरी पंप व पातळ कापडाच्या माध्यमातून पिकांवर औषध पावडरची फवारणी करीत आहे. परिसरात आगाऊ पेरणी 

झालेले शाळू पीक 2 ते 3 फुटापर्यंत तर काही ठिकाणी 3 ते 4 फुटापर्यंत तर गव्हाचे पीकही चांगले पोसले असून हरभरा पीकही चांगले सुधारले आहे. या पिकांची काही ठिकाणी आंतरमशागत सुरू असून उशिरा  पेरणी झालेल्या पिकांची बाळभांगलण सुरू आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण चांगले  झाल्याने वेदगंगा व दूधगंगा दुथडी  वाहत आहेत. शिवारातील विहिरींच्या पाण्याची पातळीही टिकून आहे. शेतकरीवर्गाने शेतीला लागून असणार्‍या ओहळ, नाले व इतर ठिकाणी पाणी असल्याने पंप व इंजिन बसवून उपसा करून पिके जगवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. शेतकरीवर्गही पहिली तोड मिळणार्‍या कारखान्याला ऊस देऊन रान रिकामे करून पाण्याची सोय करून यामध्ये मका, हरभरा, शाळू, कडवा व भाजीपाल्याचे उत्पादन घ्यायचा. यावर्षी अद्यापही एक, दोन कारखाने वगळता ऊसतोडणीची कामे जोमाने सुरू नाहीत. यामुळे ज्या शेतकर्‍यांना ऊस पाठवून लागलीच त्या क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकाचे उत्पादन घ्यायचे होते अशांची गोची झाली आहे.