Mon, Jul 22, 2019 01:23होमपेज › Belgaon › रस्ते गटारींसाठी कोटीचा निधी

रस्ते गटारींसाठी कोटीचा निधी

Published On: Feb 21 2018 1:21AM | Last Updated: Feb 21 2018 12:03AMचिकोडी, निपाणी:  प्रतिनिधी

निपाणी नगरपालिकेचा 5 लाख 28 हजार रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. नगरपालिकेच्या सभागृहात पार पडलेल्या सभेत सभापती नितीन साळुंखे यांनी अर्थसंकल्प सादर केला. सार्‍या नगरसेवकांनी त्याला अनुमोदन दिले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर होते.  कर आणि सरकारी अनुदान 16 कोटी 23 लाख रुपये, कॅपीटल ग्रॅन्ट 7 कोटी 77 लाख, इतर साधारण जमा 4 कोटी 74 लाख असे एकूण 28 कोटी 75 लाख 39 हजार  रुपये जमा रक्कम आहे.  तर 28 कोटी 70 लाख 10 हजार खर्च आहे.

तर 5 लाख 28 हजार 968 रुपये शिल्लक आहे. राजा शिव छत्रपती सांस्कृतिक भवनकरिता 50 लाख, सार्वजनिक कामे रस्ता, फूटपाथ, गटार कामा करीता 1 कोटी 4 लाख 78 हजार, पथदीपांकरीता 31 लाख 56 हजार, सीसीटीव्ही बसविण्यासाठी 5 लाख, सार्वजनिक शौचालये व मुतारींसाठी 45 लाख 12 हजार, घनकचरा निर्मुलन व एसडब्ल्यूएमकरीता 48 लाख 84 हजार, पाणी पुरवठा विभागाकरिता 49 लाख 66 हजार, सार्वजनिक उद्यानांच्या विकासासाठी 1 कोटी 65 लाख 4 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली असून यात शहरातील लोकमान्य टिळक उद्यान, प्रतिभा नगर, श्री छत्रपती संभाजी महाराज उद्यान, गायत्री नगर उद्यान, श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, प्रगती नगर श्री महादेव उद्यान आदिंचा समावेश आहे.
स्मशानभूमी स्मशानभूमींचा विकास व विद्युत दाहिनीच्या खरेदीसाठी 1 कोटी 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून श्री हनुमान गुंड, साखरवाडी, लिंगायत स्मशान/रुद्रभूमी, कब्रस्तान, ख्रिश्‍चन दफन भूमी, जत्राटवेस स्मशान आदी स्मशानांचा  विकास केला जाणार आहे. 

विकासकामे म्युनिसिपल शाळा नवीन इमारतीच्या बांधकामासाठी 75 लाख, इदगाह मैदान संरक्षण भिंतीचे बांधकाम व मैदान सपाटीकरणासाठी 20 लाखे, श्री छत्रपती संभाजी महाराज स्मारक बांधण्यासाठी 10 लाख रुपये, इमारत/गाळे व क्रीडा मैदान तयार करण्याकरिता 90 लाख, बॅरिस्टर नाथ पै चौक, हुतात़्मा कमळाबाई मोहिते चौक, राजमाता जिजामाता चौक, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक सुशोभीकरणासाठी 50 लाख, श्री हनुमान मंदिर साखरवाडी रस्त्यामध्ये जात असल्याने नुकसान भरपाई 25 लाख, शादी महल बांधकामाकरिता 20 लाख, इतर खर्च व राष्ट्रीय

उत्सवांसाठी 1 कोटी 13 लाख, 24.10 टक्के निधी नगरपालिका फंडातून एससी/एसटी विकासाकरीता  7 लाख 78 हजार, 24.10 टक्के निधी अनटाईड फंडातून एससी/एसटी जनतेच्या विकासासाठी 35 लाख 40 हजार, 7.25 टक्के निधी नगरपालिका फंडातून अर्थिक व इतर मागासवर्गीय लोकांच्या विकासासाठी 1 लाख 56 हजार, 7.25 टक़्के एसएफसी अनटाईड फंडातून अर्थिक व इतर मागासवर्गीय जनतेच्या विकासाकरिता 5 लाख 48 हजारे, 3 टक़्के निधी नगरपालिका अनुदानातून 96 हजार, 3 टक़्के निधी एसएफसी अनुदानातून अपंगांच्या विकासासाठी 3 लाख 40 हजार, असा एकूण 10 कोटी 78 लाख 23 हजार 12 रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. 

शड्डू ठोकून या : गाडीवड्डर 

बाहेरुन  राजकारण करण्यापेक्षा शड्डू ठोकून चर्चेसाठी यावे, असा इशारा नगराध्यक्ष गाडीवड्डर यांनी विरोधकांना अर्थसंकल्पीय सभेत दिला.
गाडीवड्डर म्हणाले, राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनाचे काम पूर्ण होत आहे. यासाठी नगरोत्थान योजनेतून 90 लाख, खासदार प्रकाश हुक्केरींकडून 1 कोटीचा निधी, तसेच महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह अनेकांची भेट घेउन मागणी केली होती. 2 कोटी 80 लाखात केवळ या भवनाच्या उभारणीचे काम होणार आहे.

आतील कामासाठ अर्थसंकल्पात 50 लाखाची तरतूद करण्यात आली आहे. भवनाचे काम व्हावे ही सर्व जाती धर्माच्या लोकांची इच्छा आहे. पण कांही लोकांनी पालिकेची बदनामी करत आहेत. याविषयी पत्र दिल्यास पालिकेत विशेष सभा घेऊ. 2017-18 च्या अर्थसंकल्पातील तरतूदीनूसार  संपूर्ण खर्च करण्यात आला आहे. केवळ वायफाय सुविधा टेंडर प्रक्रियेच्या कांही त्रुटींमुळे राबविता आलेली नाही. यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांकडे प्रस्ताव पाठवला जाईल.

यावेळी उपनगराध्यक्ष सुनिल पाटील, नगरसेवक बाळासाहेब देसाई सरकार, राज पठाण, संजय सागांवकर, जुबेर बागवान, दिलिप पठाडे, राजेंद्र चव्हाण, इम्तियाझ काझी, धनाजी निर्मळे, दतू जोत्रे, विजय टवळे, निता बागडे, निता लाटकर, अंनिस मुल्ला, सुजाता कोकरे, भारती घोरपडे, नम्रता कमते, मिनाक्षी बुरुड यांच्यासह इतर नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते. आयुक्त दीपक हरदी यांनी स्वागत केले.