Tue, Apr 23, 2019 02:06होमपेज › Belgaon › अधिवेशन काळात निपाणी पोलिसांना दिलासा

अधिवेशन काळात निपाणी पोलिसांना दिलासा

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

निपाणी : मधुकर पाटील

राज्य सरकारच्या वतीने बेळगाव येथे भरविण्यात आलेले हिवाळी अधिवेशन शुक्रवारी संपले. या अधिवेशनासाठी  पोलिसांचा  प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात आला असल्याने अपुर्‍या पोलिस संख्येवर निपाणी पोलिसांना कामकाज चालवावे लागले. 

अधिवेशन काळात महामेळावा,  इतर मागण्यांसाठींच्या आंदोलनाची तीव्रता असतानाही निपाणी विभागातील 65 गावांत  दोन दुचाकी चोरी, शहर व अकोळ येथील घरफोड्या तसेच गुरूवारी शहरात घडलेली रक्कम लुटीची घटना, एक महिला व युवती बेपत्ता, एक अज्ञात मृतदेह  अशा घटना वगळता कोणतीही गंभीर घटना घडली नाही.

10 दिवसांच्या काळात सीपीआय किशोर भरणी यांनी लक्ष केंद्रित करत शहराचे फौजदार शशिकांत वर्मा, ग्रामीणचे निंगनगौडा पाटील यांच्या मदतीने पहिल्या सप्ताहात तर दुसर्‍या सप्ताहात बसवेश्‍वर चौकच्या  फौजदार रोहिणी पाटील यांच्यासह  केवळ 25 पोलिसांच्या मदतीने मतदारसंघाची सुरक्षा हाताळली. निपाणी सर्कलध्ये  250 पोलिसांची आवश्यकता असताना या ठिकाणी केवळ 122 पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. यातील अनेकांना बंदोबस्तासाठीही वरिष्ठांकडून पाचारण केले जाते.

सीपीआय भरणी यांनी वरिष्ठांच्या चर्चेनुसार दोन टप्प्यांत अधिवेशन बंदोबस्ताचे नियोजन केले. त्यामुळे काहीअंशी  चार  स्थानकांत नोंदी होणार्‍या घटनांचा, गुन्ह्यांचा निपटारा लावण्यासाठी उपस्थित अधिकार्‍यांना कसरत करावी लागली. 

अधिवेशन काळात स्थानिक पोलिसांना डोळ्यांत तेल घालून काम करावे लागते. या अधिवेशनाला निपाणी सर्कलमधील 100 कर्मचारी दोन टप्प्यांत बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. विशेष म्हणजे अधिवेशनापूर्वी केवळ महिना अगोदर शहर व परिसरात घरफोड्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता. 20 हून अधिक घरफोड्या केल्या होत्या. तसेच गुन्हेगारीने डोके वर काढल्याने पोलिस यंत्रणाही बुचकळ्यात पडली होती. शिवाय शहरवासीयांतही घबराटीचे वातावरण पसरले. चिकोडीचे डीवायएसपी बी.एस.अंगडी यांनी निपाणी सर्कलची जबाबदारी असणार्‍या पाच अधिकार्‍यांवर दोन टप्प्यांत अधिवेशन बंदोबस्ताची जबाबदारी सोपवली. त्यामुळे त्यांच्यावरील कामाचा ताण वाढला गेला नाही. 
निपाणी पोलिस या ना त्या कारणाने बाहेरील बंदोबस्तावर राहतात त्या काळात शहर असो व ग्रामीण भागात सर्रासपणे गंभीर अशा घटना घडतात. मात्र, यावेळी अधिवेशन काळात निपाणी विभागातील पोलिस कर्मचार्‍यांना मात्र दिलासा मिळाला आहे.