Thu, Apr 25, 2019 07:40होमपेज › Belgaon › निपाणीत येण्यास पोलिस अधिकार्‍यांची टाळाटाळ

निपाणीत येण्यास पोलिस अधिकार्‍यांची टाळाटाळ

Published On: Dec 11 2017 1:27AM | Last Updated: Dec 10 2017 8:26PM

बुकमार्क करा

निपाणी : मधुकर पाटील

शहर स्थानकाचे फौजदार शशिकांत वर्मा यांना सीपीआय म्हणून बढती मिळाली आहे. त्यांच्या पदावर येण्यासाठी तीन ते चार अधिकार्‍यांची  नावे चर्चेत असली तरी एकही अधिकारी रुजू झालेला नाही. त्यामुळे येथे येण्यास अधिकार्‍यांनी टाळाटाळ चालविल्याचे दिसून येते. पक्ष, गटा-तटाचे राजकारण, सीमाभाग म्हणून सातत्याने घडणारे  गुन्हे, विविध कारणांनी अधिकार्‍यांना  नियमानुसार येणार्‍या तपासातील अडचणींचा हा परिणाम आहे. संवेदनशील म्हणून गणल्या गेलेल्या  या स्थानकाचे पद रिक्त ठेवता येत नाही. यामुळे वर्मा यांना वरिष्ठांकडून अद्यापही मुव्हमेंट ऑर्डर मिळालेली नाही. 
निपाणी सर्कल पोलिस कार्यालय अंतर्गत शहर, ग्रामीण व बसवेश्‍वर चौक, खडकलाट ही स्थानके आहेत.

शहर स्थानकाचे तत्कालीन फौजदार धीरज शिंदे यांची बदली झाल्यानंतर सुनील पाटील रुजू झाले. मात्र पाटील व वरिष्ठ अधिकार्‍यांत कायमच समन्वयाचा अभाव राहिला. याला येथील पक्षीय गटातटाच्या राजकारणाचे पाठबळ मिळाले. यामुळे पाटील यांनीच या पदावर राहण्यास नाराजी दाखवली. त्यांची अवघ्या 10 महिन्यात गेल्या जुलैमध्ये खानापूर प्रशिक्षण विभागात बदली झाली.
त्यांच्या जागेवर जिल्हा पातळीवर डीसीआयबी विभागात काम केलेले वर्मा रुजू झाले.  वर्मा यांनी शहरांतर्गत सर्व बाबीचा अभ्यास केला. वाहतूक तसेच विविध प्रकारातील चोरीच्या घटना हेरून त्यावर उपाययोजना करण्याचे ठरविले. त्यांनी पालिकेच्या पुढाकाराने शहरात सीसीटीव्हीसह, ट्रॅफिक सिग्नलची योजना अमलात आणली.

वर्मा यांना गेल्या महिन्यात बढती मिळाली आणि शहर स्थानकाची यंत्रणा विस्कळीत झाली. वर्मा त्यांच्या पदावर येण्यासाठी अनेकांनी प्रयत्न चालविले. एक, दोन अधिकार्‍यांची नावेही निश्‍चित झाली. मात्र पुन्हा येणार्‍या अधिकार्‍यांची मानसिकता बदलली गेली. याला कारण म्हणजे येथील गटातटाचे राजकारण व वारंवार वरिष्ठांकडून होणारा त्रास, याचा विचार येणार्‍या अधिकार्‍यांकडून झाला.
यामुळे शहर स्थानकाचा कारभार प्रभारी म्हणून वर्मा यांनाच सांभाळावा लागत आहे. आणखी किती दिवस ही जबाबदारी सांभाळावी लागणार याचीच चिंता वर्मांना आहे. त्यांना आज ना उद्या बढती मिळालेल्या पदावर रुजू व्हावे लागणार आहे. निपाणीचा उरुस तोंडावर असून विधानसभा निवडणुकीचे वारेही वाहू लागले आहे. हे पाहता येणार्‍या नवख्या अधिकार्‍याचा कस लागणार आहे. येणारा अधिकारी आपल्या मर्जीतील असावा यासाठी आजी-माजी लोकप्रतिनिधीनीही चांगल्या अधिकार्‍यांची पारख चालविली आहे.