Sun, Jul 21, 2019 16:31
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › निपाणी तालुका न झाल्यास महामार्ग रोको

निपाणी तालुका न झाल्यास महामार्ग रोको

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 30 2017 12:26AM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी

तालुका होणार अशी घोषणा करूनही शेवटच्या क्षणी निपाणीचे नाव वगळल्याने जनतेला रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी सर्वपक्षीय नेत्यांनी रस्त्यावर येऊन मूकमोर्चा काढला, तसेच महामार्ग रोको आणि आमरण उपोषण करण्याचा इशारा  दिला. सरकारने निपाणी वासीयांच्या मागणीची दखल घेत 2 जानेवारीअखेर निपाणी तालुका घोषणा न केल्यास 3 जानेवारीपासून आंदोलनाचे हत्यार उगारण्यात येईल, असा इशारा निपाणी तालुका संघर्ष समितीच्या वतीने नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी दिला. शुक्रवारी सकाळी 11 वा. छ.संभाजीराजे चौकापासून विशेष तहसील कार्यालयावर मूकमोर्चा काढण्यात आला. उपतहसीलदार एन. बी. गेज्जी यांना निवेदन देण्यात आले. 

मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. तेथे 15 जानेवारीपासून नगराध्यक्ष गाडीवड्डर व माजी आ. सुभाष जोशी यांनी आमरण उपोषण  करण्याचा इशारा दिला.  प्रा.जोशी म्हणाले, दि. 3 पासून निपाणी तालुक्यातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावरील व राज्य महामार्गावरील सर्व गावचे नागरिक रास्तारोकोचे हत्यार उगारतील. याचबरोबरच साखळी उपोषणासदेखील दि. 15 पासून सुरु केले जाईल. हालशुगर संचालक आर.वाय.पाटील म्हणाले, नव्या निपाणी तालुक्यात समावेश होण्यासाठी चिखलव्हाळ, पट्टणकुडी, वाळकी, खडकलाट व नवलिहाळ ग्रा.पं.व्याप्तीत येणार्‍या नागरिकांचा या आंदोलनास जाहीर पाठिंबा आहे. लक्ष्मणराव चिंगळे म्हणाले, तालुका निर्मिती प्रलंबित न राहता प्रशासनाने तत्काळ मंजुरी द्यावी. वकील संघाचे दिवसभरच्या कामकाजावर बहिष्कार घालून तालुका मागणीला पाठिंबा दिल्याचे अध्यक्षा अनिता सूर्यवंशी यांनी सांगितले. पंकज पाटील म्हणाले, या मागणीस शहरासह संपूर्ण ग्रामीण भागाचा पाठिंबा आहे. प्रसंगी महामार्गाचे कर्नाटकातील प्रवेशद्वार असणारा कोगनोळी टोलनाका बंद करु.