Mon, Aug 19, 2019 06:56होमपेज › Belgaon › पालिका निवडणूक जाहीर, इच्छुकांची तारांबळ

पालिका निवडणूक जाहीर, इच्छुकांची तारांबळ

Published On: Aug 03 2018 1:33AM | Last Updated: Aug 02 2018 11:59PMनिपाणी : राजेश शेडगे

नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्याने इच्छुकांची तारांबळ उडाली आहे. निवडणूक आयुक्‍तांनी राज्यातील ज्या पालिकांची मुदत ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये संपते त्यांच्या निवडणुका 29 ऑगस्ट रोजी घेण्याची घोषणा केली आहे. निपाणी पालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत 12 सप्टेंबर रोजी संपणार आहे. यामुळे आचारसंहिता लागू झाली आहे.

2008 व 2013 साली झालेली पालिकेची निवडणूक एकाच आरक्षणावर झाली. यंदाच्या निवडणुकीसाठी वॉर्ड पुनर्रचनेसह आरक्षण बदलून आले आहे. तरीसुध्दा सत्तारूढ गटाने आपल्याला सोयीस्कर होईल, असे आरक्षण बदलून आणले असल्याची चर्चा शहरात रंगली होती.

अंतिम आरक्षणात 14 बदल झाले असून सत्तारूढ गटातील अनेक नगरसेवकांना पुन्हा निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. वॉर्ड 1 हा एससी महिला झाला आहे. याठिकाणी विद्यमान नगरसेविका नीता लाटकर यांना संधी मिळणार आहे. वॉर्ड 3 मागासवर्ग अ झाल्याने येथून संजय सांगावकर तिसर्‍यांदा भविष्य आजमावणार आहेत. वॉर्ड 4 मधून नगरसेवक रवींद्र शिंदे व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत जासूद, वॉर्ड 9 मधून माजी सभापती नितीन साळुंखे यांची पत्नी, वॉर्ड 12 मधून शिरिष कमते, वॉर्ड 13 मधून नगरसेवक दिलीप पठाडे यांची पत्नी भविष्य आजमावणार आहेत.

वॉडर्ं 16 व 17 मधून धनाजी निर्मळे व राजेंद्र चव्हाण यांना संधी मिळणार आहे. वॉर्ड  22 मधून किरण कोकरे, वॉर्ड 23 मधून नगरसेवक राज पठाण व शेरू बडेघर, वॉर्ड 27 मधून बाळासाहेब देसाई सरकार, वॉर्ड 24 व 31 मधून विद्यमान नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर हे दोन्ही ठिकाणाहून भविष्य आजमावणार आहेत. 

आघाड्यांचे राजकारण गतिमान

निवडणुकीसाठी आघाड्यांचे राजकारण गतिमान बनले आहे. सत्तारूढ गटावर ताशेरे ओढणारी पत्रकार परिषद काही माजी नगराध्यक्षांनी बेळगावात घेऊन निवडणुकीतील पवित्रा स्पष्ट केला आहे. शहरातील काही व्यक्‍ती व दादाराजे निपाणकर सरकार यांनी एकत्र येऊन निपाणी शहर विकास आघाडी स्थापन केली आहे. नगराध्यक्ष गाडीवड्डर हे कै. विश्‍वासराव शिंदे आघाडी करतात की काँग्रेसच्या झेंड्याखाली निवडणूक लढवितात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीत निधर्मी जनता दल, बसप, शिवसेना किती जागा लढविणार, यावरही निवडणुकीचे चित्र अवलंबून आहे.

भाजपकडे सर्वांचे लक्ष

भाजप कोणत्या उमेदवारांना रिंगणात उतरविणार, याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. सलग दुसर्‍यांदा निपाणी मतदारसंघातून निवडून आलेल्या आ. शशिकला जोल्ले यांची पालिका भाजपच्या हाती घेण्याची मन:कामना आहे. हालसिद्धनाथ कारखान्याची निवडणूक 15 सप्टेंबर रोजी होणार आहे. तत्पूर्वी पालिकेची निवडणूक होणार असल्याने भाजपच्या हालचालींकडे काँग्रेस व निजदचे लक्ष लागून राहिले आहे. ही निवडणूक काँग्रेस विरुद्ध भाजप अशी रंगणार आहे. निवडणुकीत जय-पराजयाचे आखाडे आतापासूनच बांधायला सुरूवात झाली आहे.