Thu, Jul 18, 2019 01:03होमपेज › Belgaon › निपाणी पालिका आरक्षणाने विद्यमानांची कोंडी

निपाणी पालिका आरक्षणाने विद्यमानांची कोंडी

Published On: Jun 10 2018 1:47AM | Last Updated: Jun 09 2018 10:35PMनिपाणी : राजेश शेडगे

येथील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वॉर्ड पुनर्रचनेसह आरक्षण जाहीर झाल्याने अनेक इच्छुकांच्या पदरी निराशा आली आहे. त्यामुळे कारभारी नगरसेवकांसह विद्यमान नगरसेवकांना सुरक्षित वॉर्ड शोधावे लागणार आहेत. विद्यमानांची कोंडी करणारे आरक्षण जाहीर झाल्याच्या प्रतिक्रिया शहरातून  उमटत आहेत.

गेल्या 10 वर्षात झालेल्या दोन निवडणुका एकाच आरक्षणावर  पार पडल्या. यंदा आरक्षण बदलणार हे स्पष्टच होते. यावेळी निपाणी बसस्थानक केंद्रबिंदू मानून वॉर्डांची रचना केल्याने पूर्वीचे वॉर्ड नंबर व भाग बदलला असून पुनर्रचना अँटी क्‍लॉकवॉईज करण्यात आली आहे. या वॉर्ड रचनेनुसारच नगरपालिकेची येणारी निवडणूक होणार आहेत. पूर्वी अनेक वॉर्डातील लोकसंख्येचे प्रमाण काही वॉर्डात अधिक तर काही वॉर्डातील लोकसंख्येचे प्रमाण अत्यंत कमी होते. पण आता नवीन वॉर्ड रचनेमध्ये लोकसंख्या समान ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. एकूण 31 पैकी वॉर्ड 23 मध्ये सर्वाधिक 2579 तर वॉर्ड क्र.30 मध्ये सर्वात कमी 1370 लोकसंख्या ठेवण्यात आली आहे. 

2011 सालच्या जनगणनेनुसार शहराची 68 हजार लोकसंख्या गृहित धरुन वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली आहे. शहरातील लोकसंख्या मोठी असल्याने येथे प्रभागाचा आकार लहान असून शहराबाहेरील उपनगरांचे वॉर्ड आकाराने मोठे करण्यात आले आहेत. सध्या तयार करण्यात आलेल्या प्रभागानुसार वॉर्ड क्र.13 सर्वाधिक आकाराचे असल्याचे दिसून येते.  यापूर्वी 2006 साली 2001 सालच्या जनगणनेनुसार वॉर्डांची रचना करण्यात आली होती. जुने वॉर्ड फोडले गेल्याने विद्यमान नगरसेवकाचे वॉर्ड रचनेसह क्रमांकही बदलले गेले आहेत. शिवाय आरक्षणही वेगळेच आले आहे. विद्यमान सभागृहात 12 महिला दिसत होत्या. शासनाने महिलांना 50 टक्के आरक्षण लागू केल्याने आता नव्या सभागृहात 15 महिला दिसणार आहेत.

अनेक इच्छुकांची निराशा

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांची घोर निराशा झाली आहे. निपाणी पालिकेच्या अनेक नगरसेवकांनी विजयाची हॅट्ट्रिक केली असून काहीजण चार ते पाचवेळा पालिकेेत दिसून येत आहेत. काहीजण सलग दुसर्‍या सभागृहात दिसून येत होते. या सर्वांना आता सुरक्षित वॉर्ड शोधावा लागणार आहे.