Thu, Feb 21, 2019 11:08होमपेज › Belgaon › ओढ्यावरील स्लॅबवरून शाब्दिक चकमक

ओढ्यावरील स्लॅबवरून शाब्दिक चकमक

Published On: Feb 10 2018 1:28AM | Last Updated: Feb 09 2018 11:36PMनिपाणी  : प्रतिनिधी

निपाणी नगरपालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मुरगूड रोडवरील ग्रीन झोन पार्कमधील ओढ्यावर टाकण्यात आलेला स्लॅब हा अतिक्रमित असल्याचा आरोप सत्तारूढ गटाने केल्याने  विरोधी आणि सत्तारू गटात जोरदार चर्चा झाली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर होते. सभेसमोरील विषयांमध्ये  म्युनिसिपल हायस्कूलमधील शिक्षकांची वेतनवाढ हा विषय प्रलंबित ठेवणे, आंदोलननगर येथे लायब्ररी सुरू करणे, सकल मराठा समाज व वीरशैव कक्‍कय समाजाला सांस्कृतिक हॉल बांधण्यासाठी जागा देणे, बेळगाव नाका येथे बॅ. नाथ पै. यांचा पुतळा उभारणे व रस्त्याला कै. बाळासाहेब घोरपडे मार्ग नामकरण करणे, बसवाण नगर येथे लिंकरोड साठी सर्व्हे नं. 115 मधील जागा भूसंपादन करणे, विविध निविदांना मंजुरी देणे आदी विषयांवर चर्चा झाली.

तसेच अनुदानातील शिल्लक  रकमेतून करावयाच्या कामांना चर्चा करून मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकार्‍यांनी सर्व्हे नं. 128 मधील अतिक्रमणाबाबत पुनर्विचार करण्याबाबत पालिकेला पत्र पाठविल्याने या विषयावरील चर्चा रंगली. प्रवीण भाटले यांनी बसवेश्‍वर गार्डन व जासूद यांच्या जागेकडे यावेळी लक्ष वेधले. दत्ता जोेत्रे व दीपक माने यांनी आमदारांनी चार उद्यानांचा विकास केल्याचे सांगितले. ओढ्यावरील जागा हडपली नसून ती नागरिकांना फिरण्यासाठी उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. जुबेर बागवान यांनी सदर जागा जोत्स्ना सुभाष शाह यांनी एनए लेआऊट करून ग्रीन झोनला विकली असून याकामी पालिकेतील अधिकार्‍यांनी भ्रष्ट कारभार केल्याचा आरोप केला.

नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी जनतेची सेवा करण्यासाठीच निवडून दिलेले असते. जंगल, ओढा आणि नदी अडविता येत नसल्याचे स्पष्ट केले. पावसाळ्यात परिसरातील नागरिकांना त्रास होतो. या जागेतील खुली जागा पालिकेला न सोडता ओढ्याची खुली जागा सोडण्यात आल्याचे सांगितले. दबावतंत्राचा वापर करून अधिकार्‍यांना थांबविले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातूनच या कामी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला.महादेव उत्सव मंडळाला 51 हजार रूपये देणे, सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती करण्यासह विकासकामांवर चर्चा झाली. सभेला उपनगराध्यक्ष सुनील पाटील, सभापती नजहतपरवीन मुजावर, बाळासाहेब देसाई, सहा. कार्यकारी अभियंता पी. जे. शेंडुरे यांच्यासह नगरसेवकांची उपस्थिती होती.