Wed, Aug 21, 2019 19:17होमपेज › Belgaon › टोलनाक्याच्या कठड्याला दूध वाहतूक टेम्पोची धडक

टोलनाक्याच्या कठड्याला दूध वाहतूक टेम्पोची धडक

Published On: Dec 24 2017 1:43AM | Last Updated: Dec 23 2017 10:53PM

बुकमार्क करा

निपाणी ः प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर  कोगनोळी टोलनाक्याच्या संरक्षक कठड्यावर भरधाव असणार्‍या गोकुळ संघाच्या पॅकिंग दूध वाहतूक टेम्पोने जोरात धडक दिली. या अपघातात टेम्पोतील तीन प्रवासी कर्मचारी गंभीर जखमी झाले. तर भीषण धडकेमुळे टेम्पोचे दोन भाग झाले. हा अपघात शनिवारी सकाळी 8.30 च्या सुमारास झाला. गंभीर जखमीवर सरकारी म.गांधी रुग्णालयात उपचार सुरू असून चालक फरार झाला आहे. 

बेळगाव परिसरात पॅकिंग दूध देऊन टेम्पोचालक संघाकडे एमआयडीसी येथे काम करणार्‍या तीन कर्मचार्‍यांना घेऊन परतत होता.टेम्पो कोगनोळी हद्दीतील टोलनाका येथे आला असता चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे भरधाव टेम्पोने  टोलनाक्याच्या केबीन संरक्षक सिंमेट कठड्याला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, धडक बसताच वाहनाचे दोन भाग झाले.

टेम्पोमधून गोकुळ शिरगाव एमआयडीसीकडे जाणारे कर्मचारी सिध्दलिंग यलापा येळुरे (वय 42, रा. लेटेक्स कॉलनी, निपाणी), मोहन नारायण टाकळे (वय 35, रा.शिवाजीनगर, निपाणी) व सुनीता कुमार वडर (वय 26, रा.निपाणी) हे गंभीर जखमी झाले. जखमींना टोलनाक्यावरील अ‍ॅम्बुलन्सच्या सहाय्याने अधीक्षक  लकडे व मगदूम यांनी उपचारासाठी सरकारी म. गांधी रुग्णालयात हलविले.
पूंजलॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक अण्णाप्पा खराडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन टोलनाका केबीन मार्गात अडकून राहिलेला टेम्पो बाजला घेऊन वाहतूक सुरळीत करून दिली.

दरम्यान घटनास्थळी ग्रामीण स्थानकाचे सहाययक फौजदार एम.आर.अंची, के.एस.कल्लापगौडर यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत टोलनाका प्रशासनाने टेम्पो चालकाविरोधात ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली असून पुढील तपास फौजदार कल्लापगौडर यांनी चालविला आहे. टेम्पो सुमारे 50 फूट फरफटत येऊन संरक्षक कठड्यावर आदळला. कठडा नसता तर टोलनाका केबीनवर वाहन आदळून दुर्घटना घडली असती.