Tue, Mar 26, 2019 22:11होमपेज › Belgaon › आमच्या गावांचाही निपाणी तालुक्यात समावेश करा

आमच्या गावांचाही निपाणी तालुक्यात समावेश करा

Published On: Dec 30 2017 12:33AM | Last Updated: Dec 29 2017 9:56PM

बुकमार्क करा
निपाणी : महादेव बन्ने

निपाणी तालुका घोषणा प्रलंबित राहिल्याने निपाणीसह परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. निपाणी तालुक्यामध्ये आपला समावेश व्हावा, यासाठी हुक्केरी तालुक्यातील 5 ग्रा.पं.नी पुढाकार घेतला असून याबाबतचे निवेदन प्रशासनाला दिले आहे. विविध तालुका पुनर्रचना समित्यांनी निपाणीस तालुक्याचा दर्जा देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार जानेवारीमध्ये सुरू होणार्‍या नव्या तालुक्यांच्या यादीमध्ये निपाणीचे नाव होते. मात्र ऐनवेळी निपाणीचे नाव गॅझेटमधून वगळल्याने शहर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे. प्रस्तावित निपाणी तालुक्यात चिकोडी-सदलगा मतदारसंघातील चिखलव्हाळ, पट्टणकुडी, वाळकी, खडकलाट व नवलिहाळ ग्राम पंचायतअंतर्गत येणार्‍या 9 गावांचा समावेश करावा, अशी मागणी भागातील नागरिकांनी केली आहे. निपाणी येथे होणार्‍या आंदोलनास पाठिंबा देण्याचा निर्णय तेथील नागरिकांनी घेतला आहे.

याप्रमाणेच निपाणीपासून जवळ असणार्‍या पण हुक्केरी तालुक्यात समावेश असणार्‍या  बुगटेआलूर, हिटणी, शिप्पूर, मत्तिवडे व बाड या ग्रामपंचायतींदेखील आपल्या गावांचा  निपाणी तालुक्यात समावेश करावा, अशी मागणी केली आहे. त्यानुसार या ग्राम पंचायतींनी ग्रामसभेत तशा आशयाचे ठराव मंजूर करून घेतले आहेत. वरील सर्व गावे निपाणीपासून 8 ते 12 कि.मी.वर आहेत. निपाणीतील आठवडी बाजार, जनावरांचा बाजार, शाळा, महाविद्यालय, विविध खतांची, कपड्यांची, सोन्याची बाजारपेठ, दवाखाना, मनोरंजन, प्रवास, कृषी  अशा विविध बाबतींत वरील गावच्या लोकांचा सातत्याने निपाणीशी संपर्क येत असतो.

मात्र तालुका हुक्केरी असल्याने तालुकास्तरीय कामासाठी जावयाचे झाल्यास 20 कि.मी. अंतर कापावे लागते. यामुळे निपाणी तालुक्यामध्ये या गावांचा समावेश केल्यास तो गरिकांच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याचे निवेदन अनेक गावच्या नागरिकांमार्फत प्रशासनाला देण्यात आले  आहे. निपाणी तालुका निर्मिती प्रक्रिया लांबणीवर गेल्याने या भागातील नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. याला वरील सर्व गावांतील नागरिकांनी जाहीर पाठिंबा दिला असून येत्या काळात जाहीर होणार्‍या निपाणी तालुक्यात आपल्या गावांचादेखील समावेश केला जावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यामुळे या आंदोलनाची व्याप्ती वाढत चालली आहे.