Sun, Jul 21, 2019 01:26होमपेज › Belgaon › शेतकर्‍यांच्या विकासाबाबत सर्वच पक्ष उदासीन

शेतकर्‍यांच्या विकासाबाबत सर्वच पक्ष उदासीन

Published On: Apr 07 2018 1:40AM | Last Updated: Apr 06 2018 8:38PMनिपाणी : प्रतिनिधी 

शेती उत्पादनाला हमीभाव मिळण्यासाठी शेतकरी संघटित झाला पाहिजे. शेतकर्‍यांचे भले करण्याची प्रवृत्ती कोणत्याही राजकीय पक्षात नाही, असे मनोगत माजी आमदार सुभाष जोशी यांनी व्यक्‍त केले.निपाणी येथे हुतात्मा शेतकर्‍यांना अभिवादनप्रसंगी ते बोलत होते. प्रा. जोशी पुढे म्हणाले, शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती मजबूत होण्यासाठी कृषी मालाला योग्य हमीभाव मिळण्याची गरज आहे. शेतकर्‍यांनी संघटित होऊन विकासासाठी प्रयत्न करावेत. शेतकर्‍यांचे भले चिंतन्याची वृत्ती शासनाची नसून शेतकर्‍यांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे. पिकांना योग्य भाव मिळाल्यास शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावेल.

स्वाभिमानी शेतकरी संघटनचे राजेंद्र गड्ड्याण्णावर म्हणाले, शेतकर्‍यांना हमीभाव मिळण्यासाठी देशातील शेतकरी संघटना खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येत आहेत. केंद्र व राज्य शासनाला अनुकूल निर्णय घेण्यास भाग पाडले जाईल. प्रा. आर. बी. खोत यांनी शेतकर्‍यांना पेन्शन सुरू केल्यास आत्महत्या थांबतील, असे सांगितले. आय . एन. बेग यांनी, शेती उत्पादन वाढल्यास भाव कोसळतात. तेव्हा शेतकर्‍यांनी स्वावलंबी बनून शहाणपणाने पिकांमध्ये विविधता आणण्याची गरज आहे, असे मत व्यक्‍त केले.

यावेळी एस. के. पाटील, चंद्रकांत तारळे, बाळकृष्ण चेंडके, आण्णासो कुर्‍हाडे, अभय मानवी बचाराम सांडूगडे, एन. आय. खोत, प्रा. सचिन खोत, जयराम मिरजकर, चंद्रकांत खराडे, विलास शिंदे, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
 

 

yags : Nipani,news,farmers, Development, not, interested, Political, parties, Martyr, farmers, greeting,