Thu, Jul 18, 2019 21:49होमपेज › Belgaon › निपाणीजवळ दोन अपघात, एक ठार

निपाणीजवळ दोन अपघात, एक ठार

Published On: Jan 30 2018 1:55AM | Last Updated: Jan 29 2018 10:41PMनिपाणी: प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी हद्दीतील स्टार हायवे हॉटेल ते वेदगंगा नदीपात्रापर्यंतच्या तीन किमी अंतरात आयशर व टेम्पो अशा दोन्ही वाहनांच्या अपघातात टेम्पो चालक ठार तर अन्य तिघे जखमी झाले.  मोद्दिनसाब महंमदगौस बागवान(वय 44 रा.बागवान गल्ली) घटप्रभा असे मृताचे नाव आहे. टेम्पोतील महिला मेहराज मेहबूब बागवान (वय 54,  रा.घटप्रभा) तर आयशरमधील बबलू उमाटे (वय 32, रा.तुळजापूर) यांच्यासह अन्य एक असे तिघे जखमी झाले. त्यांच्यावर येथील सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोन्ही वाहनांच्या चालकांचे नियंत्रण सुटल्याने हे अपघात झाल्याची माहिती बसवेश्‍वर चौक पोलिसांनी दिली.

मोद्दिनसाब हा टेम्पोतून  भाजीपाला घेऊन कोल्हापूरमार्गे रत्नागिरीकडे जात होता. टेम्पो हॉटेल स्टार हायवेनजीक आले असता चालकाचा ताबा सुटल्याने वाहन दुभाजकावर आदळले. यात चालक वाहनाखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर टेम्पोतील मेहराज या गंभीर जखमी झाल्या. दरम्यान, या अपघातस्थळापासून तीन कि.मी.अंतरावर नदीपुलाजवळ दुसर्‍या वाहनाने ओव्हरटेक केल्याने पुण्याहून घटप्रभेकडे भाजीपाला आणण्यासाठी जाणार्‍या आयशर वाहनचालक बबलू उमाटेचा ताबा सुटला.

त्यामुळे वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक खांबावर आदळले. यात बबलूसह क्‍लीनर (नाव समजू शकले नाही) हे दोघे जखमी झाले.  अपघातांमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनास्थळी पुंजलॉईडच्या भरारी पथकाचे निरीक्षक सचिन हुक्केरी यांनी सहकार्‍यांसह धाव घेऊन वाहतूक सुरळीत करून दिली. पीएसआय बी. वाय. बेटगेरी यांनी सहकार्‍यांसह पंचनामा केला. तीन नावांमुळे गोंधळ टेम्पो अपघातातील मृत मोद्दिनसाब यांना अन्य दोन टोपन नावाने ओळखले जाते. त्यामुळे पोलिस प्रशासनासह नातेवाईकांत गोंधळ उडाला.