Mon, May 20, 2019 21:00होमपेज › Belgaon › सुक्या चार्‍याला येणार सोन्याचा भाव

सुक्या चार्‍याला येणार सोन्याचा भाव

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

निपाणी : मधुकर पाटील 

परिसरात ओल्या चार्‍याचा सुकाळ झाला असून सुक्या चार्‍याला सोन्याचा भाव आला आहे. पारंपरिक पीक पद्धतीला फाटा दिल्याने शेतकरीवर्गाला मोठा पश्‍चाताप झाला आहे. क्षेत्र घटीसह परतीच्या पावसाचा हा परिणाम असून जनावरांसाठी सुक्या चार्‍याची खरेदी करताना त्याच्या नाकीनऊ येणार आहे. अद्याप नदीकाठच्या गवत कापणीला सुरूवात नसली तरी येत्या पंधरवड्यात ती सुरू होऊन त्याचा दर पडणार आहे.

या रब्बी हंगामात परिसरात शाळू पिकाचे शेतकरीवर्गाने अमाप उत्पादन घेतले असले तरी पुढे पीक कसे येते यावरच चार्‍याची बेजमी अवलंबून आहे. परिसरातील दूधगंगा व वेदगंगा नद्यांना बारमाही पाण्याची सोय झाल्याने या भागातील शिवारात ऊस क्षेत्रासह भाजीपाला क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. यामध्ये एरव्ही जनावरासांठी उपयुक्त ठरणार्‍या नदीकाठावरील गवती क्षेत्रातही कमालीची घट झाली आहे. जवळजवळ 70 टक्के गवती क्षेत्र घटल्याने सध्या नदीकाठच्या गवताला सोन्याचा भाव येणार आहे. डोंगराळ भागातील करडी गवताचा दर यंदाच भडकला आहे. सध्या या भागात नदीकाठच्या गवताचा हजारी पेंडीचा दर  5 हजार रु.  तर करडी गवताचा दर 3 हजार रु. होईल, असा शेतकर्‍यांचा अंदाज आहे.

जास्त पावसात सुक्या चार्‍याची कमतरता ही जाणवतेच हे गृहीत धरून सध्या शेतकरीवर्गाने गवताची खरेदी करण्याचे नियोजन आखले आहे. गेल्या चार-पाच वर्षांपासून शेतकरीवर्गाला हमखासपणे जास्त पाऊस काळात सुक्या चार्‍याच्या टंचाईला तोंड द्यावे लागले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग आता शहाणा झाला आहे. 

यावर्षीही परिसरात उसाचे पीक अमाप झाले असून शाळू पीकही चांगले आले आहे. त्यामुळे माळमुरड जमिनीतील या पिकाची कापणी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होईल, अशी आशा आहे. साहजिकच शाळू पिकाचेही क्षेत्र वाढल्याने कडब्याचा दरही काही प्रमाणात स्थिर राहणार असला तरी सारे काही पुढच्या पीक परिस्थितीसह हवामानावर अवलंबून आहे. गतवर्षी कडब्याचा पेंडीचा दर 1500 ते 1800 रू. शेकडा झाला होता. तोच भावी यंदाही राहील, असे चित्र आहे.  सध्या अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने गवातासह शाळू पिकांवर त्याचा परिणाम होणार आहे. सध्या ऊसतोडणीचा हंगाम सुरू असून या भागातील शेतकरीवर्ग व पीक परिस्थितीचा अंदाज घेऊन ऊस तोड मजुरांनी ऊसवाड्यांचा दरही वाढवला आहे.