Sat, Apr 20, 2019 10:02होमपेज › Belgaon › परवानाधारक बंदुका जमा करून घ्या

परवानाधारक बंदुका जमा करून घ्या

Published On: Feb 05 2018 1:59AM | Last Updated: Feb 04 2018 11:50PMनिपाणी : प्रतिनिधी

आगामी होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलिस प्रशासनाला जिल्हा प्रशासनाने   नागरिकांकडे असलेल्या परवानाधारक बंदुका जमा करून घ्याव्यात, असा आदेश काढला आहे.त्यामुळे जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून असलेल्या परवानाधारक बंदुकीचा गैरवापर होऊ नये म्हणून आदेश करण्यात आला आहे. अद्याप काढण्यात आलेल्या आदेशाला मुदत नसून केवळ बंदुका जमा करून घ्या, असे आदेशात म्हटले आहे. अर्थात हा आदेश म्हणजे साहजिकच प्रशासनालाही निवडणुकीचे वेध लागल्याचे दिसून आले आहेत.

सद्यस्थितीत निपाणी सर्कलअंतर्गत असलेल्या निपाणी शहर, ग्रामीण, बसवेश्‍वर चौक  व खडकलाट या चार स्थानकात येणार्‍या 52 गावात एकूण 179 परवानाधारक बंदुका आहेत. यामध्ये ग्रामीण स्थानकांतर्गत 65 तर त्या खालोखाल शहर स्थानक कक्षेतील शहर व पाच गावात 57, बसवेश्‍वर चौक पोलिस स्थानकाकडे 36 तर खडकलाट स्थानकाकडे 21 अशा परवानाधारक बंदुकीची संख्या आहे. या सर्व बंदुका जमा करण्याचे आदेश प्राप्त झाल्याची माहिती निपाणी पोलिसांनी  दिली.