Sun, Jul 21, 2019 16:32
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › स्वच्छ सर्वेक्षणाला 4 जानेवारीपासून प्रारंभ

स्वच्छ सर्वेक्षणाला 4 जानेवारीपासून प्रारंभ

Published On: Dec 14 2017 1:44AM | Last Updated: Dec 13 2017 9:30PM

बुकमार्क करा

निपाणी ः महादेव बन्ने 

केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी  तिसर्‍या स्वच्छ सर्वेक्षणाला दि. 4 जानेवारीपासून सुरुवात होणार असून यावर्षी प्रथमच केवळ महानगरांमध्ये सर्वेक्षण होण्याऐवजी देशातील सर्व 4041 नगरांचा सर्व्हे केला जाणार आहे. यामध्ये कर्नाटकातील 277 तर बेळगाव जिल्ह्यातील 33 नगरांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्समार्फत देशातील शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षणास प्रारंभ केला. 2016 मध्ये केवळ 73 महानगर व 2017 मध्ये देशातील 1 लाखहून अधिक लोकसंख्या असलेल्या 434 नगरांचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र, 2018 साली देशातील सर्व 4041 नगरांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे.

बेळगाव जिल्ह्यात 1 महानगरपालिका, 2 नगरपालिका, 16 नगरपरिषद तर 14 नगरपंचायत आहेत. या सर्व ठिकाणी दि. 4 ते 31 जानेवारीपर्यंत केंद्रातील पथक भेट देऊन या नगरातील एकूण 52 विविध मुद्यांवर मूल्यांकन करणार आहे. यासाठी गुण ठरविण्यात आले आहे. सॅनिटेशन कंपोनंटवाईज वेटेज विभागात 100 टक्केपैकी हागणदारीमुक्त नगरसाठी (ओडीएफ) 30 टक्के, कचरा प्रक्रिया व विल्हेवाट प्रक्रियेसाठी 25 टक्के, कचरा संकलन व वाहतुकीसाठी 30 टक्के, जनजागृती व घेण्यात आलेल्या कार्यक्रमांसाठी 5 टक्के, स्वच्छता विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांकडे असलेल्या माहितीसाठी 5 टक्के तसेच स्वच्छतेच्या विशेष कार्यासाठी 5 टक्के गुण ठेवण्यात आले आहेत.

याशिवाय असेसमेंट वेटेजसाठी 100 टक्के गुण असून यापैकी संबंधित पालिकेकडून शहरात देण्यात आलेल्या सेवेसाठी 35 टक्के, शहरवासियांच्या प्रतिक्रियेस 35 टक्के तर पथकाने प्रत्यक्ष भेट देऊन केलेल्या पाहणीसाठी 30 टक्केप्रमाणे गुणांची विभागणी करण्यात आली आहे. या सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यातील सर्व नगर आघाडीवर राहावीत, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रकल्प अधिकारी प्रवीण बागेवाडी यांनी सर्व शहरांना भेट देऊन तेथील प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार सर्व प्रशासकीय यंत्रणा कामाला लागल्या आहेत. या सर्वेक्षणासाठी सर्व पालिकांनी कोणती तयारी करावी यासाठी केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्सने मार्गदर्शक सूची तयार केली आहे. तपासणी पूर्ण झाल्यावर दि. 26 मार्च 2018 रोजी या सर्वेक्षणाचा निकाल घोषित केला जाणार आहे.