Thu, Aug 22, 2019 11:07होमपेज › Belgaon › उरुसावर असेल सीसीटीव्हीची नजर

उरुसावर असेल सीसीटीव्हीची नजर

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 26 2017 8:24PM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी 

हिंदु-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणार्‍या येथील हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या उरुसाला दि.29 पासून सुरुवात होणार आहे. हा उत्सव हिंदु-मुस्लिम बांधवानी  शांततेत पार पाडावा, असे आवाहन सीपीआय किशोर भरणी यांनी केले. उरुस काळात याहीवर्षीही सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर राहणार आहे. सोमवारी शहर स्थानक आवारात आयोजित शांतता कमिटी बैठकीत भरणी बोलत होते. अध्यक्षस्थानी  नगराध्यक्ष विलास गाडीवडर होते. स्वागत व प्रास्ताविक फौजदार शशिकांत वर्मा यांनी केले. भरणी म्हणाले,  उरुसाला अनेक वर्षाची परंपरा असून तीन दिवस चालणार्‍या या उत्सवकाळात नागरिक सर्व ते सोपस्कार गुण्यागोविंदाने पार पाडतात. अलीकडच्या काळात या उरुसाला होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिस प्रशासनानेही दर्गा परिसरात बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. येणार्‍या नागरिकांना दर्शन व्यवस्थित घेता यावे, यासाठी उरुस कमिटीतर्फे वेगळी सोय केली आहे.

मुलींची छेडछाड होऊ नये, यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. जुगार चालणार नाही, यासाठी पोलिसांचे  टेहळणी पथक राहील. दर्गा परिसरात तीन दिवस चालणार्‍या या उत्सवकाळात नागरिकांनी वाहने न आणू नयेत. नागरिकांनी चोरट्यांपासून सावध राहावे. महिलांनी किमती दागिने परिधान न करता दर्शनास यावे. एखादी घटना घडल्यास पोलिसांशी संपर्क साधावा. दर्गा व शहर परिसरात ठिकठिकाणी सीसीटीव्हीची नजर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी पोलिस प्रशासनाला काही सूचना केल्या. गतसाली पोलिस कुमक कमी असतानाही प्रशासनाने हा उत्सव शांततेने पार पाडल्याबद्दल आभार मानले. उरुसासाठी येणार्‍या सर्व फिरत्या व्यापार्‍यांनी दुकाने व स्टॉल लावताना पालिकेची परवानगी घ्यावी. उत्सव कमिटीने ठरवून दिलेल्या जागेतच  स्टॉल लावावेत. फिरत्या व्यापार्‍यांनी उत्सव काळात  परवानगी घेऊन विजेचा वापर करावा, असे बाळासाहेब देसाई सरकार म्हणाले. फौजदार शशिकांत वर्मा यांनी बंदोबस्ताच्या नियोजनाची माहिती दिली.  नगरसेवक राज पठाण, जयराम मिरजकर, दिलावर गडकरी यांनीही विचार मांडले. बैठकीस नगरसेविका नीता बागडे, किरण कोकरे, शिरीष कमते, शेरू बडेघर, शरीफ बेपारी, हावलदार संदीप गाडीवड्डर, शेखर असोदे, एम. एम. जंबगी, शांतता कमिटी सदस्य, नागरिक उपस्थित होते. हवालदार बसवराज न्हावी यांनी आभार मानले.