Mon, Apr 22, 2019 23:41होमपेज › Belgaon › केळी व्यवसायातून रोज ४५ हजार रूपयाची उलाढाल

केळी व्यवसायातून रोज ४५ हजार रूपयाची उलाढाल

Published On: Dec 25 2017 1:21AM | Last Updated: Dec 24 2017 8:32PM

बुकमार्क करा

निपाणी  : मधुकर पाटील 

निपाणी परिसरात केळी व्यवसायाचा नावलौकिक वाढत चालला आहे.  येथील केळी व्यवसाय हा टप्प्याटप्प्याने विस्तारत चालला आहे. बेळगाव, कोल्हापूर येथील मार्केटच्या तुलनेत निपाणीतील दररोजची केळी खरेदीˆविक्रीची उलाढाल 40 ते  45 हजारच्या घरात असून येथील केळीला मागणी वाढत चालली आहे. यंदा निसर्गाची चांगली साथ लाभल्याने परिसरातील केळी बागा या बहरल्या आहेत. त्यामुळे स्थानिक बागातूनच केळीची आवक मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सध्या बाजारपेठेत केळीचा दर डझनला 25 ते 30 रु. आहे. निपाणी परिसरात केळीच्या बागा उदयास येण्यापूर्वी महाराष्ट्र, तामिळनाडू व आंध्र येथून केळीची आवक होत होती.  सध्या खडकलाट, बेडकिहाळ, सौंदलगा, भिवशी, बेनाडी, अकोळ, कोगनोळी या गावात केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. दरवर्षी 30 ते 40 टनांपर्यंत उत्पादन निघते. यावर्षीही चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.  

सध्या केळीचा भाव स्थिर असला तरी येथील केळीचे मार्केट ऑगस्टनंतर जोमात चालते. गणपती, दसरा, दीपावली हे सण काही टप्प्याने येत असल्याने या हंगामात मोठी उलाढाल होते. त्याशिवाय जानेवारीनंतर  जत्रा, यात्रा, लग्नसराई, वास्तूशांती व इतर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असल्याने केळीला मागणी वाढते. यापूर्वी निपाणी भागातील दर्जेदार केळी धारवाड, बेळगाव, कोल्हापूर व संकेश्‍वर परिसरात मोठ्या प्रमाणात जात होती. मात्र अलीकडच्या काळात हे चित्र बदलले आहे. सध्या अनेक होलसेल व्यापारी शेतकर्‍यांशी थेट संपर्क साधून मालाची खरेदी करत आहेत. शहरातील 300 पेक्षा जास्त कुटुंबे या व्यवसायात आहेत. केळीवर प्रक्रिया करणार्‍या सात ते आठ भट्टी असून या भट्टीतून रोज 40 ते 45 हजार रु.  केळ्यांची विक्री होत आहे. जवारी केळीचा दरही तेजीत असून हे फळ बाहेरगावाहून मार्केटमध्ये येत आहे. जवारी केळ्याचा दर सध्या 40 ते 50 रु.डझन आहे. जवारी केळीचे उत्पादन कमी झाल्याने यावर्षी प्रथमच दर भडकला आहे.