Tue, Mar 19, 2019 05:09होमपेज › Belgaon › निपाणी विधानसभा मतदारसंघ हाच तालुका!

निपाणी विधानसभा मतदारसंघ हाच तालुका!

Published On: Jan 02 2018 12:58AM | Last Updated: Jan 01 2018 11:19PM

बुकमार्क करा
निपाणी :  महादेव बन्‍ने

शासनाच्या अधिसूचीमध्ये निपाणी तालुक्याचे नाव नसल्याने, निपाणी भागात झालेल्या आंदोलनाची व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची दखल घेऊन सरकार व प्रशासनाने निपाणी तालुक्याच्या हालचाली गतिमान केल्या आहेत. त्यानुसार निपाणी विधानसभा मतदारसंघ हाच तालुका याप्रमाणे निर्मिती करण्यात आली आहे.

नव्याने तयार होणार्‍या तालुक्यामध्ये चिकोडी-सदलगा मतदारसंघातील व हुक्केरी तालुक्यातील ‘त्या’ 5 ग्राम पंचायतींचा समावेश करण्यात आला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 2014 साली प्रस्तावित निपाणी तालुक्यानुसार 55 गावांचा समावेश करण्यात आला आहे. या तालुका निर्मितीवेळी चिकोडी-सदलगा मतदारसंघाच्या व्याप्तीत येणार्‍या चिखलव्हाळ, वाळकी, पट्टणकुडी, खडकलाट व नवलिहाळ तसेच हुक्केरी तालुक्यातील शिप्पूर, हिटणी, बाड, कणगला व मत्तिवडे या ग्राम पंचायतींनी आमचा समावेश निपाणी तालुक्यात करावा, अशी मागणी केली होती. या ग्रा.पं. व्याप्तीत येणार्‍या गावातील नागरिकांचे जवळपास सर्व व्यवहार निपाणीशी निगडीत आहेत. 

दि. 12 डिसेंबर रोजी महसूल खात्याचे उपकार्यदर्शी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी काढलेल्या नोटिफिकेशनमध्ये सरकारने घोषित केलेल्या 49 पैकी प्रथम टप्प्यात 28 तालुके कायर्रत करण्यासाठी सूचना केलेल्या यादीमध्ये निपाणीचा समावेश नव्हता. याची माहिती मिळताच गेल्या आठवड्यापासून निपाणी तालुका विभागात मोठ्या प्रमाणात जनक्षोभ उसळला. सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधींनी याप्रश्‍नी आवाज उठविला. जनता रस्त्यावर उतरली. त्यामुळे सरकार व प्रशासनाने याची दखल घेत निपाणी तालुका शिफारस फाईलवर आवश्यक  तांत्रिक बाबी पूर्ण करीत सह्या केल्या. त्यामुळे निपाणी तालुका घोषित होण्याचा मार्ग मोकळा झाला. आता तालुका कधी कार्यान्वित होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.