Wed, Apr 24, 2019 19:28होमपेज › Belgaon › विकासकामांच्या गणितातून विजयाचे सूत्र

विकासकामांच्या गणितातून विजयाचे सूत्र

Published On: May 17 2018 1:28AM | Last Updated: May 16 2018 10:35PMनिपाणी : प्रतिनिधी

निपाणी विधानसभा मतदारसंघातून सलग दुसर्‍यांदा विजय संपादन करताना भाजपच्या आ. शशिकला जोल्ले यांनी काँग्रेसचे उमेदवार माजी आ. काकासाहेब पाटील यांच्यासह माजी आ. वीरकुमार पाटील, प्रा. सुभाष जोशी आणि खा. प्रकाश हुक्केरी यांना नामोहरम केले.  विकासकामांच्या जोरावर आ. जोल्‍लेंनी निवडणूक प्रचारात आघाडी घेतली. आ. जोल्‍लेंना विकासकामांचे गणितच विजयाचे यशस्वी सूत्र ठरले.  

आ. जोल्ले यांना 2013 साली 81 हजार 860 मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत मतदान वाढून 87 हजार 6 झाले. प्रतिस्पर्धी काका पाटील यांच्यावर 8500 मतांची आघाडी घेऊन विजय मिळविला. त्यांचे पती चिकोडी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाचे उमेदवार म्हणून व्यस्त राहिल्याने आ. जोल्लेंना या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागेल, अशी अनेकांची धारणा होती. मतदारांनी विकासकामांना पाठिंबा देत पुन्हा एकदा आ. जोल्‍लेंच्या ओंजळीत विजयाची शिदोरी घातली.

आ. जोल्ले यांनी मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेत विजय मिळविला. अमित शाह व नितीन गडकरी या स्टार प्रचारकांच्या सभा तसेच आ. सुरेश हाळवणकर, आ. अमल महाडिक, समरजितसिंह घाटगे, शौमिका महाडिक यांच्यामुळे आ. जोल्लेंनी प्रचारात आघाडी घेतली.

माजी आ. प्रा. सुभाष जोशी आणि नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांची मते किती, असा सवाल आता विचारला जात आहे. सरांची छडी निर्णायक तर ठरली नाहीच. पण ती कूचकामी ठरल्याचे एपीएमसीच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 

भाजपला विकासकामांच्या शिदोरीवर मतदारांपर्यंत जाता आले. नियोजनबद्ध प्रचार हे भाजपच्या विजयाचे सूत्र ठरले. रा. स्व. संघाचे प्रचारक आणि कार्यकर्त्यांची लाभलेली साथही आ. जोल्लेंना पुन्हा एकदा विजयापर्यंत नेली, हे विशेष म्हणावे लागेल. काँग्रेसने सारी भिस्त निपाणी शहरावर अधिक ठेवली होती.

निपाणी शहराने काँग्रेसला 18276 तर भाजपला 15504 मते दिली. त्यामुळे काँग्रेसला केवळ 2772 एवढेच मताधिक्य घेता आले. आ. जोल्‍लेंना ग्रामीण भागातून मताधिक्य मिळत विजयाचा मार्ग सुकर बनला.