होमपेज › Belgaon › अ‍ॅम्ब्युलन्सची ट्रॅक्टरला धडक

अ‍ॅम्ब्युलन्सची ट्रॅक्टरला धडक

Published On: Dec 25 2017 1:20AM | Last Updated: Dec 24 2017 10:53PM

बुकमार्क करा

निपाणी : प्रतिनिधी

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हॉटेल सहारानजीक ऊस भरून जाणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीला अ‍ॅम्ब्युलन्सने मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार, तर चौघे गंभीर जखमी झाले. बंडू रामचंद्र पाटील (वय 80, मूळगाव कडवे, ता. शाहूवाडी, सध्या रा.भायखळा वेस्ट, मुंबई) असे मृताचे नाव आहे. जखमी चौघांवर निपाणी व कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद बसवेश्‍वर चौक पोलिसांत झाली आहे.

अधिक माहिती अशी की, न्यू सातारा वेल्फेअर चॅरिटेबल सेंटरच्या अ‍ॅम्ब्युलन्स क्र.एमएच 46 एएच 0671 मधून चालक सर्जेराव विनायकराव पाटील (वय 40, मूळ गाव परसणी, जि. सातारा, सध्या रा.भायखळा) व प्रशांत नंदकुमार भोके (वय 42, मूळ गाव नाशिक, सध्या रा.भायखळा) हे दोघे चालक बंडू रामचंद्र पाटील हे लकवाग्रस्त असल्याने त्यांना वाहनातून घेवून औषधोपचारासाठी  गरमुन्नोळीकडे जात होते. बंडू यांच्या समवेत त्यांचा मुलगा विलास पाटील व नातेवाईक गोपाळ नारायण जाधव (रा.भायखळा) हे दोघे असे एकूण पाचजण वाहनात होते.

हे वाहन महामार्गावरील हॉटेल सहारानजीक आले असता अ‍ॅम्ब्युलन्सला मुबंईहून बंगळूरकडे जाणार्‍या खासगी लक्झरी बसने ओव्हरटेक केला. यावेळी अ‍ॅम्ब्युलन्स चालक सर्जेराव पाटील यांचा हनावरील ताबा सुटल्याने कागलहून कापशी येथील घोरपडे कारखान्याकडे जाणार्‍या ऊस वाहतूक ट्रॅक्टरला मागून जोराची धडक दिली. यावेळी वाहनातील रुग्ण बंडू पाटील यांच्यासह विलास, गोपाळ तसेच चालक सर्जेराव व बाजूला बसलेले प्रशांत हे सर्वजण ट्रॅक्टर टॉलीवर आदळले. यामध्ये बंडू पाटील यांच्या डोक्याला तर विलास व गोपाळ यांच्यासह चालक दोघांनाही गंभीर दुखापत झाली.

गंभीरपैकी चालक दोघे वगळता तिघांना तातडीने 108 वाहनाने सरकारी म.गांधी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना बंडू पाटील यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी फौजदार रोहिणी पाटील, हावलदार एस.एम.सनदी यांनी भेट देवून पाहणी केली. ट्रॅक्टर चालक प्रकाश शांताराम ळतकर (रा.देवराई,  जि.बीड) यांच्यासह अ‍ॅम्ब्युलन्स वाहनाचा दुसरा चालक प्रशांत यांनी बसवेश्‍वर चौक पोलिसांत फिर्याद दिली.