Sun, Jul 21, 2019 01:25होमपेज › Belgaon › पांगिरेतील मंदिरात चोरी

पांगिरेतील मंदिरात चोरी

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 23 2018 11:54PMनिपाणी : प्रतिनिधी

पांगिरे (ए) येथे गावच्या मध्यभागी असलेल्या 1008 नेमिनाथ दिगबंर जैन मंदिरात सोमवारी मध्यरात्री सुमारे 8 लाखांची चोरी झाली. चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य दरवाजासह गर्भकुटी व शिखर मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून साडेचौदा किलो चांदीचे आणि तीन तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. मंदिरातील दोन्ही मूर्तींच्या अंगावर तसेच वरच्या मजल्यावर तिजोरीत हे दागिने ठेवलेले होते. गावच्या मध्यभागी दुमजली मंदिर असून मंदिरात अनेक वर्षांपासून धर्मनाथ उपाध्ये व वर्धमान उपाध्ये (पंडित) हे दोघे पुजारी वास्तव्यास असतात. सोमवारी धर्मनाथ यांच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया असल्याने दोघेही उपचारासाठी इचलकरंजीला गेले होते. ही संधी चोरट्यांनी साधली. मूर्तीची बामणमाळ, छत्री तसेच मंगळसूत्र, किरीट, नथणी, कपाळावरील दागिन्यांचा चोरीला गेलेल्या ऐवजात समावेश आहे. 

मंगळवारी सकाळी चोरी लक्षात आल्याने ट्रस्टी प्रवीण कुमार चौगुले यांच्यासह बापूसो पाटील, अण्णासाहेब पाटील, सुंदर पाटील यांनी पोलिसांत कळवले. चिकोडीचे पोलिस उपअधीक्षक दयानंद पवार, निपाणीचे सीपीआय किशोर भरणी यांना माहिती दिल्यानंतर खडकलाटचे पीएसआय बसगौडा पाटील, सहाय्यक डी.बी.कोतवाल यांनी सहकार्‍यांसह धाव घेतली. त्यानंतर बेळगावहून श्‍वानासह ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्‍वान मंदिरापासून अकोळ रोडवरील श्री रेणुका मंदिरापर्यंत गेले.  मंदिर कमिटीने दिलेल्या फिर्यादीनुसार खडकलाट पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास चालविला आहे.

गावकामगार पाटलांच्या घराला कडी लावून चोरी....

 मंदिरासमोर राहणारे गावकामगार पाटील बापूसो सत्यगोंडा पाटील यांच्या घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली. घटनेदरम्यान मध्यरात्री दारात कोणी तरी कुजबूज करीत असल्याची जाणीव पाटील यांनी झाली. त्यांनी कोण ते म्हणताच दोन दुचाकीवरून आलेल्या चोरटे पसार झाल्याची जाणीव झाल्याचे पाटील यांनी पोलिसांना सांगितले.