Wed, Aug 21, 2019 02:39होमपेज › Belgaon › 58 गावांसाठी केवळ 10 पोलिस

58 गावांसाठी केवळ 10 पोलिस

Published On: Feb 25 2018 1:15AM | Last Updated: Feb 25 2018 12:08AMनिपाणी : प्रतिनिधी

काँग्रेसचे राष्टीय अध्यक्ष राहुल गांधी शनिवारपासून मंगळवार  दि. 27 अखेर बेळगाव, विजापूर, बागलकोट व धारवाड जिल्ह्यांच्या दौर्‍यावर आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व पोलिस यंत्रणा या दौर्‍याच्या बंदोबस्तासाठी कार्यरत आहे. निपाणी सर्कलअंतर्गत येणार्‍या चार  पोलिस स्थानकांतील 120 पैकी जवळपास 110  पोलिस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर गेल्याने  या सर्कलची जबाबदारी केवळ 10 कर्मचारीच सांभाळत आहेत. मंगळवारपर्यंत ही स्थिती राहणार असल्याने या विभागातील कायदा व सुवव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

निपाणी शहर राष्ट्रीय महामार्गाला लगत सीमावर्ती भागाला लागून आहे. त्यामुळे या विभागात कायमच विविध प्रकारच्या गुन्ह्यांच्या घटना घडत असतात. त्यामुळे  पोलिस कर्मचारी व अधिकारी हजर असणे आवश्यक आहे. असे असताना कायमच बेळगाव व इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी निपाणी सर्कलमधील पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांना पाचारण केले जाते. त्यामुळे सर्कलअंतर्गत येणार्‍या दैनदिंन कामावर विपरित परिणाम होत आहे.  

अलीकडेच शहरात सीसीटीव्ही व सिग्नल कार्यरत झाल्याने या बाबी हाताळण्यासाठी  कायमच पोलिस कर्मचारी अशा ठिकाणी हजर असणे आवश्यक आहे. मात्र,  निपाणी पोलिसांनाच  कायमच  बाहेरगावच्या बंदोबस्तासाठी बोलविण्यात येत येते. त्यामुळे वरिष्ठांनी या सर्कलमध्ये कायमस्वरूपी जादा पोलिस कर्मचारी व अधिकारी कसे कार्यरत राहतील, याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पोलिस कर्मचारी व नागरिकांतून होत आहे.