Thu, Aug 22, 2019 08:13होमपेज › Belgaon › निपाणीच्या नगराध्यक्षा कोण?

निपाणीच्या नगराध्यक्षा कोण?

Published On: Sep 07 2018 1:04AM | Last Updated: Sep 07 2018 1:04AMनिपाणी : राजेश शेडगे

नगरपालिकेची निवडणूक होऊन चार दिवस झाले तरीही अद्याप पालिकेवर कोणाची सत्ता येणार, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे निपाणीच्या नव्या आणि नवव्या नगराध्यक्षा कोणत्या पक्षाच्या? भाजपच्या की काँग्रेसच्या, या प्रश्‍नाचे  उत्तर अद्याप सापडलेले नाही. 

भाजपने हालशुगर निवडणुकीच्या प्रचाराच्या उदघाटनावेळी आपले बहुमत असल्याचा दावा केला. पण, अपक्ष ज्या पक्षाला पाठिंबा देतील त्यांना सत्ता मिळणार असल्याने अपक्षांच्या निर्णयाची वाट पाहिली जात आहे.
नगरपालिकेत आजतागायत 8 महिलांना नगराध्यक्ष होण्याचा मान मिळाला आहे. नयनतारा नलवडे, जयश्री लाखे, सुनीता होनकांबळे, शुभांगी जोशी, पुष्पाताई कुंभार, भारती घोरपडे, नम्रता कमतेव सुजाता कोकरे यांना नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली. नव्या सभागृहाचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण सामान्य महिला आल्याने नगराध्यक्षा कोण बनणार, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.

यंदा भाजपाने स्वबळावर निवडणूक लढवून सर्वाधिक 13 जागा पटकाविल्या. काँग्रेसप्रणित शहर विकास आघाडीने 12 तर अपक्षांनी 6 जागा मिळविल्याने पालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. अपक्षांपैकी दिपाली गिरी या भाजपात तर नगिना मुल्ला या शहर विकास आघाडीला जावून मिळाल्याने दोन्ही गटाचे संख्याबळ  प्रत्येकी एकने वाढले आहे. 

विलास गाडीवड्डर हे दोन वॉर्डातून निवडून आल्याने त्यांना नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत एकच मतदानाचा अधिकार मिळणार आहे. त्यामुळे शहर विकास आघाडीला अपक्ष येऊन मिळाल्याशिवाय त्यांची सत्ता होणार नाही. याउलट भाजपला केवळ दोन अपक्षांची गरज आहे.  बहुमताचा आकडा गाठण्यासाठी बुधवारी सायंकाळी भिवशी येथे काही नगरसेवकांसमवेत बैठक झाल्याचे वृत्त आहे.

गतवेळी झालेल्या निवडणुकीत भाजपाला केवळ 6 जागा मिळाल्या होत्या. पण पालिकेच्या राजकारणात या पक्षाने पहिली अडीच वर्षे सत्ताकारण केले, हे विसरून चालणार नाही. 6 जागा असताना पहिल्या वर्षी दीपक माने यांना सभापतीपद तर सव्वावर्षांंनंतर नम्रता कमते यांना नगराध्यक्षपद मिळाले होते. त्यावेळी रिसॉर्ट व 31 एकचे राजकारणही गाजले होते. आता हालशुगर कारखान्याची निवडणूक झाल्यावर सर्वांना लोकसभा निवडणुकीचे वेध लागणार आहेत. त्यामुळे पालिकेची सत्ता आपल्या हाती घेण्यासाठी भाजप व काँग्रेसची धडपड सुरू आहे.  भाजपाने केलेल्या दाव्यात कितपत सत्यता आहे, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

भाजपच्या आ. शशिकला जोल्ले यांना पालिकेची सत्ता आपल्या हाती हवी आहे. त्यांनी पक्षाच्या जाहीरनाम्यात अनेक शहर विकासाची आश्‍वासनेही दिली आहेत. शहर विकास आघाडीनेही आपल्या जाहीरनाम्यात विकासाला महत्त्व दिले आहे. काहीजणांसाठी भाजप गळ टाकण्याची शक्यताही व्यक्‍त  होत आहे. पण कोणत्याही गटाला अपक्षाला सोबत घेऊन आणि त्यांना पदे देऊन सत्ताकारण करणे परवडणारे नाही.