Wed, Apr 24, 2019 16:26होमपेज › Belgaon › निपाणी पालिका सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन घेणार

निपाणी पालिका सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन घेणार

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:14AMनिपाणी : प्रतिनिधी

नगरपालिकेतर्फे शहरातील महिला स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन बसविण्यात येणार आहे. त्याचे नमुना मशीन मागविण्यात आल्याची माहिती आरोग्य खात्याचे विवेक बन्ने यांनी दिली. 

बन्‍ने म्हणाले, या मशीनची किंमत 50 हजारांपासून 80 हजारापर्यंत आहे. शहरातील 7 सार्वजनिक महिला स्वच्छतागृहात मशीन बसविण्याची योजना  तयार केली आहे. शहरात मूत्र विसर्जन करण्यासाठी स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्याने विविध भागात स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. यासाठी तयार  फायबरची  स्वच्छतागृहे खरेदी करण्यात येणार आहेत.

निपाणी शहर जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर असल्याने वर्दळ अधिक असते. शहरात स्वच्छतागृहांची वानवा असल्याने नागरिकांची कुचंबणा होते. सध्या बसस्थानक सोडून लाफाएट हॉस्पिटल, बेळगाव नाका, चाटे मार्केट येथे स्वच्छतागृहे आहेत. अशोकनगर या व्यापारी पेठेत स्वच्छतागृह नसल्याने गैरसोय होते.

अनेकांकडून घर आणि दुकानाजवळ स्वच्छतागृह निर्माण करण्यास नकार अधिक आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतागृहांची संख्याही कमी झाली आहे. पालिकेने तयार स्वच्छतागृहे जागा असेल तेथे उभारावीत, अशी नागरिकांची मागणी आहे. 

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी कचरा डबेही ठिकठिकाणी ठेवण्याची सोय पालिका करणार आहे. सध्या घरोघरी फिरून घंटागाडीद्वारे कचरा उचल केला जातो. व्यापारी पेठ, भाजी मार्केटमध्ये कचराडब्यांची गरज आहे. पालिकेने 40 डबे मागविले आहेत. डबे हिरवे व निळे असून हिरव्या डब्यात ओला तर निळ्या डब्यात सुका कचरा टाकण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

घनकचरा निर्मूलनासाठी डबे उपयोगी पडणार आहेत. पालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असून नागरिकांनी स्वच्छ व सुंदर शहरासाठी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी केले.