Fri, Jul 19, 2019 22:50होमपेज › Belgaon › निपाणीत टक्का घसरला; लाभ कुणाला?

निपाणीत टक्का घसरला; लाभ कुणाला?

Published On: Sep 01 2018 1:45AM | Last Updated: Aug 31 2018 11:15PMनिपाणी : प्रतिनिधी

बेळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आणि शहराबरोबरच ग्रामीण भागात उत्सुकता असलेल्या निपाणी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी 31 रोजी तणावपूर्ण वातावरणात इर्षा व चुरशीने  72.34 टक्के इतके मतदान झाले. सोमवार 3 रोजी मतमोजणी होणार  असून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे. एकुण 50 हजार 14 मतदारांपैकी 36 हजार 181 जणांनी मतदानाचा हक्‍क बजावला.

2013 मध्ये झालेल्या निवडणुकीत मतदान 75.67 टक्के झाले होते. गतवेळच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्‍का घसरल्याचे दिसून आले. यंदाची सुरुवातीपासूनची इर्षा, चुरस आणि पैशांचा झालेला घोडेबाजार पाहता टक्केवारी वाढेल, अशी अपेक्षा होती. पण  गतवेळच्या तुलनेत 3 टक्यांनी मतदानात घट झाली. 

मतदानादिवशी किरकोळ बाचाबाची वगळता दिवसभरात शांततेत मतदान झाले. 31 जागांसाठी 130 उमेदवारांचे भवितव्य मतयंत्रामध्ये बंद झाले आहे. मावळत्या सभागृहातील  नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, उपनगराध्यक्ष सुनील पाटील यांच्या पत्नी गीता पाटील, सभापती अनिस मुल्ला यांच्या मातोश्री नगिना मुल्ला,  माजी नगराध्यक्ष प्रवीण सडोलकर-भाटले, राज पठाण, बाळासाहेब देसाई-सरकार, रवींद्र शिंदे, दत्ता जोत्रे, निता बागडे, आशा विजय टवळे, माजी नगराध्यक्ष भरत कुरबेट्टी, शहर भाजप अध्यक्ष जयवंत भाटले, इम्तियाज काझी  तसेच माधुरी जीवन घस्ते यांच्यासह अनेक माजी नगरसेवकांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे.

कोट्यवधी रूपयांचा चुराडा व टोकाला पोहचलेली इर्षा, मतदारांना दाखविण्यात आलेली विविध प्रलोभणे, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी, मतदानाच्या आदल्या दिवसापर्यंत सर्वच वॉर्डात दिसलेली चुरस मतदानातून स्पष्ट झाली. मतदाराची ओळख पटविणे, मतदारांना ने-आण करणे व मतदान केंद्रात ये-जा करण्यावरून उमेदवार व निवडणूक एजंटांमध्ये वादावादी व बाचाबाचीचे प्रकार घडले.

मतदान बुथ केंद्रांना आ. शशिकला जोल्ले, सहकारनेते आण्णासाहेब जोल्‍ले, माजी आ. काकासाहेब पाटील, प्रा. सुभाष जोशी, राजेश कदम, युवानेते उत्तम पाटील, सूजय पाटील यांच्यासह नेतेमंडळीनी भेटी   दिल्या. सकाळी 11 वाजेपर्यंत 25 टक्के मतदान झाले होते. दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत बहुतांश वॉर्डांमध्ये 50 टक्के तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व वॉर्डात मिळून 72.34 टक्के मतदान झाले.  सुव्यवस्था राखण्यासाठी सीपीआय किशोर भरणी, उपनिरिक्षक एच. डी. मुल्‍ला, बी. जी. सुबापूरमठ, ए. के. नदाफ यांनी बंदोबस्त ठेवला होता.