Wed, May 22, 2019 06:14होमपेज › Belgaon › निपाणीत भाजपला १३, काँग्रेसला १२

निपाणीत भाजपला १३, काँग्रेसला १२

Published On: Sep 04 2018 1:16AM | Last Updated: Sep 03 2018 11:54PMनिपाणी : प्रतिनिधी

संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या निपाणी नगरपालिका निवडणुकीचा निकाल 3 रोजी जाहीर झाला. भाजप आणि काँग्रेस पूरस्कृत शहर विकास आघाडीमध्ये झालेल्या थेट निवडणुकीत धक्‍कादायक निकाल हाती आला आहे. एकुण 31 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपला 13 व काँग्रेस पुरस्कृत  शहर विकास पॅनेलला 12 जागांवर विजय मिळविला आहे. अन्य 6 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले असून सत्ता स्थापनेसाठी अपक्ष उमेदवार किंगमेकर ठरणार असून सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती गेल्या आहेत. विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी निकाल हाती येताच गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.

भाजप आणि काँग्रेस पक्षाच्या नेतेमंडळींच्या प्रतिष्ठेची बनलेल्या निवडणुकीत कोणालाही एकहाती सत्ता मिळालेली नाही. चिकोडी येथील आर. डी. पदवीपूर्व महाविद्यालयात झालेल्या मतमोजणी ठिकाणी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सकाळी 10.30 वाजेपर्यंत संपूर्ण वॉर्डाचे निकाल हाती लागले. निकाल हाती येताच जल्‍लोष करीत विजयाची वार्ता आपापल्या वॉर्डातील कार्यकर्त्यांना देण्यात येत होती. पालिका निवडणूक निकालातून अपक्षांचा भाव वधारल्याने त्यांना आपल्याकडे खेचण्यात आता नेतेमंडळींना मोठी कसरत करावी लागत आहे.

अपक्षांचा भाव वधारल्याने पालिकेत सत्ता स्थापनेसाठी पुन्हा घोडेबाजार होणार, हे स्पष्ट झाले आहे. सन 2013  साली झालेल्या निवडणुकीत भाजपाने 6 जागा  मिळविल्या होत्या. यावेळी 13 जागा पटकावून सत्तेपर्यंत मजल मारली आहे. मात्र अपक्ष त्यांच्या गळाला लागणार का? एक-एक निकाल हाती येताच विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत आणि विजयाच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला. शहरात सर्वच वॉर्डांमध्ये आपापल्या उमेदवारांच्या विजयाची वार्ता कळताच फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

पालिकेच्या रणधुमाळीत विद्यमान सभागृहातील 14 नगरसेवकांनी पुन्हा आपले भविष्य  आजमावले होते. त्यापैकी 5 नगरसेवक पुन्हा निवडून आले. शिवाय रिंगणात 11 विद्यमान नगरसेवकांचे नातेवाईकही उतरले होते. त्यापैकी  6 जणांना विजय मिळविता आला. या निवडणुकीत सहाव्यांदा प्रवीण भाटले निवडणूक रिंगणात होते. त्यांना यंदा पराभवाला सामोरे जावे लागले. चौथ्यावेळी  इम्तियाज काझी रिंगणात होते. त्यांनाही यंदा पराभवाला सामोरे जावे लागले. विलास गाडीवड्डर यंदा चौथ्यांदा रिंगणात होते. त्यांनी वॉर्ड क्र. 24  व 31 या दोन्ही वॉर्डातून विजय मिळविला.

तिसर्‍यांदा रिंगणात असलेले संजय सांगावकर, बाळासाहेब देसाई यांनी विजयाची हॅट्ट्रीक साधली आहे. पण तिसर्‍यांदा रिंगणात असलेले  राज पठाण यांना पराभवाला सामोरे जावे लागले. दुसर्‍यांदा रिंगणात असलेले रवींद्र शिंदे, निता बागडे यांचा विजय झाला असून  माजी नगराध्यक्षा नम्रता कमते, धनाजी निर्मळे, दत्ता जोत्रे व निता लाटकर  यांचा पराभव झाला.जुबेर बागवान यांच्या पत्नी जस्मीन व भावजय तब्बसूम यांचा पराभव झाला. माजी नगराध्यक्षा सुजाता कोकरे यांचे पती किरण कोकरे यांच्यासह 2007 साली झालेल्या निवडणुकीत विजय झालेले माजी नगरसेवक माधुरी घस्ते, अजय माने, पांडूरंग चव्हाण, महादेव चव्हाण तसेच अनिल शिंदे यांच्या पत्नी सुजाता यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले. माजी नगराध्यक्ष भरत कुरबेट्टी व माजी नगरसेवक सुहास सूर्यवंशी यांचाही पराभव झाला.

वॉर्ड क्र. 8 मधील सोनल राजेश कोठडिया यांच्यावर बोगस जात प्रमाणपत्राचा आरोप माजी आमदारांनी करूनही त्यांचा 397 मतांनी विजय झाला आहे. वॉर्ड क्र. 7 मध्ये गीता सुनील पाटील यांनी प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपच्या श्‍वेता पाटील यांचा 418 मतांनी पराभव केला. वॉर्ड क्र. 28 मध्ये शांती दीपक सावंत यांनी विक्रमी 692 मते घेऊन रिंगणातील सर्व उमेदवारांचे डिपॉझीट जप्त केले. वॉर्ड क्र. 29 मध्ये कावेरी सागर मिरजे या नवख्या उमेदवाराने माजी शासननियुक्‍त नगरसेवक मंगल चौगुले यांचा 157 मतांनी पराभव केला. अटीतटीच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांचा पराभव झाला असून मतदारांनी नवख्यांना संधी दिली आहे.