Tue, Apr 23, 2019 13:32होमपेज › Belgaon › पारंपरिक पीक क्षेत्रात वाढ

पारंपरिक पीक क्षेत्रात वाढ

Published On: Dec 27 2017 1:23AM | Last Updated: Dec 26 2017 8:38PM

बुकमार्क करा

निपाणी : मधुकर पाटील 

निपाणी व परिसरात चालू रब्बी हंगामात शेतकर्‍यांनी पारंपरिक पीक पद्धतीला प्राधान्य दिले आहे. गेल्या तीन,  चार वर्षांपासून शेतकरीवर्गाला दैनंदिन लागणार्‍या कडधान्याची मोठी झळ बसून लाखमोलाच्या दराने कडधान्याची खरेदी करावी लागल्याने शेतकरीवर्गाने शहाण्याचे रूप धारण केले आहे. परिणामी यंदाच्या हंगामात दैनंदिन आहारात लागणार्‍या शाळू, गहू, हरभरा या पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. गेल्या पाच, सहा वर्षांपासून जरी या भागात ऊसपिक क्षेत्रात मोठी वाढ झाली असली तरी यंदा मात्र ज्वारी, गहू, हरभर्‍याचे पीक उदंड आहे. हे कृषी खात्याकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले असल्याने यावर्षी बाजारपेठेत या कडधान्याचे भाव कमी राहणार असून याचा फटका व्यापारीवर्गाला  बसणार आहे.     

निपाणी परिसर हा गेल्या अनेक वर्षांपासून जरी ऊस व तंबाखू पिकासाठी प्रसिद्ध असला तरी याला गेल्या तीन, चार  वर्षांपासून अपवाद ठरत आहे. यात यावर्षी अकोळ परिसर वगळता इतर ठिकाणी घेण्यात येणार्‍या या पिकाच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे.  त्यामध्ये या पिकाकडे दुर्लक्ष करून  शेतकरीवर्गाने पाण्याची सोय करून घेऊन आपल्याकडे असणार्‍या कमी अधिक क्षेत्रावर गहू, शाळू, हरभरा हे पीक घेतले आहे. निपाणी परिसरात मध्यंतरी परतीचा पाऊस  झाल्याने साहजिकच ऊस पिकासह रब्बीतील पिकांना ते चांगले ठरले आहे. दरम्यान, ऊस तूटून गेलेल्या क्षेत्रात तातडीने रानाची स्वच्छता करून त्यामध्ये शाळू, गहू, हरभरा या पिकाचे उत्पादन या भागातील शेतकर्‍यांनी बर्‍यापैकी घेतले. अद्यापही अशा काही ठिकाणच्या क्षेत्रावर मागास पेरणीची कामे सुरू आहेत. याशिवाय अनेक शेतकर्‍यांनी या पिकाबरोबरच आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला आहे. 

या सर्व कारणामुळे यंदा शेतकरीवर्गाला व जनावरांसाठी फायद्याचे ठरणार आहे. गव्हाचे व शाळूचे पीक क्षेत्र वाढल्याने  साहजिकच जनावरांसाठी गव्हाच्या काडसाराची व शाळवाच्या कडब्याची सोय बर्‍यापैकी होणार असून पावसाळ्यात लागणार्‍या चार्‍याची बेजमी काहीअंशी झाल्याने शेतकरीवर्ग राजी झाला आहे. त्यामुळे साहजिकच यंदा काही प्रमाणात कडबा चार्‍याचे दरही स्थिर राहणार आहेत.
येथील रयत कृषी केंद्राकडून मिळालेल्या ताज्या आकडेवारीनुसार केंद्राकडे असणार्‍या एकूण 29 गावांत एकूण पीक ओलिताखाली येणारे क्षेत्र 53 हजार 62 एकर आहे. यामध्ये ज्वारीचे पीक 1395 हेक्टर,  मका 12 एकर, हरभरा 180 हेक्टर, गहू 275 हेक्टर, ऊस 6 हजार 460 हेक्टर, तंबाखू 4 हजार 310 हेक्टर याप्रमाणे पिकाचे उत्पादन शेतकरीवर्गाने घेतले आहे. यात कृषी विभागानेही सबसिडीवरील सर्व बियांणाचा अगदी वेळेत पुरवठा केला आहे. त्यामुळे वरील आकडेवारी पाहता शेतकरीवर्गाने हरभरापेक्षा गहू या  पिकाला बर्‍यापैकी प्राधान्य दिले आहे. त्यामुळे यावर्षी सर्व सणात शेतकरीवर्गाकडून पोळीच्या आहाराला प्राधान्य मिळणार आहे.

केवळ हंगामी व नगदी पीक म्हणून समजल्या जाणार्‍या कांदा पिकाखाली येणार्‍या या भागातील क्षेत्रात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे साहजिकच यंदा बाजारपेठेत जरी वरील कडधान्याचे भाव काहीअंशी स्थिर राहणार असले तरी शेतकरीवर्गासह सर्वसामान्यांना मात्र कांद्याची खरेदी करताना नाकीनऊ होणार असून यंदा कांदा हा सर्वांना रडवणार हे नक्की  आहे.  होणार काय तर...गेल्या तीन, चार वर्षांपासून वाढत्या स्पर्धेमुळे उसाला चांगला भाव मिळू लागल्याने शेतकरीवर्गाने उसाचे पीक हे अगदी घराच्या उंबरठ्यापर्यंत घेतले होते. याचा फायदा शेतकरीवर्गाला जेवढा झाला तेवढा तोटाही त्याला सहन करावा लागला. उसाला चांगला दर मिळाला असला तरी शेतकरीवर्गाला त्याच पैशातून दैनंदिन आहारात लागणार्‍या कडधान्याची खरेदी करावी लागली. यामुळे झाले असे की अतिशहाणपणाने उसाचे पीक घेऊन सोन्याच्यामोलाने धान्यांची खरेदी करावी लागल्याने गेल्या वर्षभरापासून व्यापारीवर्गाने सर्व काही जिंकले होते. यात सर्वच प्रकारच्या धान्यात भेसळ करून सरळसरळ शेतकर्‍याची लूट चालविली होती.