Thu, Nov 15, 2018 19:07होमपेज › Belgaon › निपाणीतील अपहरण प्रकरणाचा छडा

निपाणीतील अपहरण प्रकरणाचा छडा

Published On: Feb 28 2018 1:17AM | Last Updated: Feb 28 2018 12:58AMनिपाणी  : प्रतिनिधी 

 जुन्या पैशाच्या व्यवहारातून दयानंद महादेव पल्ले (वय 53, रा. घट्टे गल्ली, निपाणी) याच्या अपहरण प्रकरणाचा उलगडा मंगळवारी शहर पोलिसांनी करून चौघांना गजाआड केले. याबाबत दै. ‘पुढारी’ने सलग तीन दिवस पाठपुरावा केला होता.  निपाणी येथील घट्टे गल्ली येथील रहिवाशी दयानंद महादेव पल्ले हे वाहन विक्रीचा व्यवसाय करतात. त्यासाठी त्यांनी आपले जुने घर विकले होते. काही पैसे सलीम नदाफ यांना दिले होते. हे पैसे परत मागण्याच्या प्रकरणातून सलीम नदाफ (रा. निपाणी), हुसेन मुजावर (रा. निपाणी) यांनी 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30  वा. निपाणी बसस्थानक परिसरातून अपहरण करून रेंदाळ येथील एका शेडमध्ये ठेवण्यात आले होते.

यांचे हातपाय बांधून, डोळ्यावर पट्टी व तोंडात बोळा घालून पोत्यात घालून ठेवले होते. अशा प्रकारे 10 दिवस त्यांना मानसिक व शारीरिक त्रास देण्यात येत होता. याप्रकरणी सलीम व हुसेन यांना दत्तात्रय खोत (रा. सदलगा), केतन चव्हाण (रा. रेंदाळ) यांच्यासह अन्य दोघांनी मदत केली होती. दयानंदची पत्नी छाया यांनी पती बेपत्ता झाल्याची फिर्याद निपाणी शहर पोलिसांत दिली होती. ही माहिती अपहरणकर्त्यांना मिळाल्याने त्यांनी दयानंद यांना सोडून देऊन पोलिसांत तक्रार न करण्याची धमकी दिली होती. मात्र, पल्ले यांनी निपाणी पोलिसांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. 

पोलिसांंनी या चौघांना अटक करून त्यांच्यावर अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मंडल पोलिस निरीक्षक किशोर भरणी यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार अशोक चव्हाण, सहायक फौजदार एम.जी. निलाखे, राजू दिवटे, राजू कोळी, विनोद असोदे, एस.एस. चिकोडी यांनी तपास केला.  डीवायएसपी दयानंद पवार यांनी रात्री उशिरा पोलिस स्थानकास भेट देऊन घटनेची माहिती घेतली.