Mon, Apr 22, 2019 11:55होमपेज › Belgaon › निपाणी पालिकेला निवडणुकीचे वेध

निपाणी पालिकेला निवडणुकीचे वेध

Published On: Jun 03 2018 1:12AM | Last Updated: Jun 02 2018 10:11PMनिपाणी : प्रतिनिधी

निपाणी नगरपालिकेला सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागले असून प्रभागनिहाय आरक्षणाची घोषणा लवकरच होणार आहे. 2013 साली यापूर्वीची निवडणूक झाली होती. विद्यमान सभागृहाची मुदत येत्या सप्टेेंबरपर्यंत असली तरी निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. 

शहरातील 31 प्रभागांची पुनर्रचना यापूर्वीच करण्यात आली आहे. आता चिकोडी येथे मतदारयादी पुनर्रचनेचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी पालिकेच्या महसूल विभागाचे चार-पाच कर्मचारी चिकोडीत कार्यरत आहेत. यंदा पालिका सभागृहात 50 टक्के महिला आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे 15 ते 16 महिला नगरसेविका सभागृहात दिसतील. 
पालिकेच्या  सलग दोन  निवडणुका सध्याच्या आरक्षणानुसार झाल्या होत्या. आता प्रभागांची पुनर्रचना झाली असून आरक्षणही बदलून येणार आहे. त्यामुळे कोणत्या प्रभागाला कोणते आरक्षण येणार, याकडे इच्छुकांचे लक्ष लागून राहिले आहे. विद्यमान सभागृहातील अनेक नगरसेवकही रिगणात उतरण्यास इच्छुक आहेत. 

गतवेळच्या निवडणुकीत भाजपला 6 जागा मिळाल्या होत्या तर अधिकतर जागांवर काँग्रेसला मानणारे अपक्ष मोठ्या संख्येने निवडून आले होते. पालिकेत सवर्र् नेत्यांच्या आशीर्वादाने 31-1चा प्रयोगही राबविण्यात आला होता. आतापर्यंत भारती घोरपडे, नम्रता कमते, सुजाता किरण कोकरे या महिलांना पहिली अडीच वर्षे नगराध्यक्षपदाची संधी मिळाली होती. विद्यमान नगराध्यक्ष  विलास गाडीवड्डर उर्वरित अडीच वर्षासाठी कार्यरत आहेत. आता होणारी निवडणूक विधानसभेनंतर अत्यंत चुरशीची आणि ईर्षेची होणार आहे. यावेळी भाजप चिन्हावर रिंगणात उतरतो की आघाडी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.