निपाणी : प्रतिनिधी
निपाणी मतदारसंघाच्या निकालाकडेच नव्या निपाणी तालुक्याचे लक्ष लागले आहे. या तालुक्याचे पहिले आमदार कोण होणार, याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. पुन्हा वहिनीच की यंदा काका, याचा फैसला मंगळवारी बेळगाव येथील आरपीडी महाविद्यालयात होणार्या मतमोजणीत ठरणार आहे.
शनिवारी मतदान झाल्यावर दोन दिवस नेते व कार्यकर्ते आकडेमोडीत गर्क आहेत. गावागावातून यंदा निवडून कोण येणार, यावर चर्चा रंगली. रंगतदार चर्चेतच रविवार आणि सोमवारचा दिवस आणि रात्र मागे सरकली. पैजेचे विडे रंगले असून निवडणुकीतील उमेदवारांनी कागदोपत्री दाखविलेल्या खर्चापेक्षा अधिक रकमेची उलाढाल या पैजेतून होणार आहे. प्रचंड इर्ष्येत आणि प्रतिष्ठेची ही निवडणूक झाल्याने सार्यांच्या नजरा निकालावर खिळल्या आहेत.
रिंगणातील उमेदवारांना आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारांचे पानिपत उघड्या डोळ्यांनी बघायचे आहे. गुलाल उधळून जल्लोषही करायचा आहे. कांँगे्रस व भाजपाने या निवडणुकीत आपल्या विजयाची खात्री बाळगली असल्याने विजयी कोण होणार, याचीच उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. विजयाचे आकडे व अंदाज मांडण्यात आले आहेत. रिंगणातील 10 पैकी काँग्रेस-भाजपमध्ये सरळसरळ लढत असून एकाचा विजय आणि अन्य उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागार हे कटू सत्य आहे.
उमेदवार विजयाच्या आशेवर स्वार आहेत. संभाव्य यशाचे सुख आणि समाधान आता बुधवारी निकालानंतरच लाभणार आहे. दोन्ही उमेदवारांनी श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी येथील हालसिद्धनाथांच्या साक्षीने आपला प्रचार शुभारंभ केला होता. त्यामुळे हालसिद्धनाथ यावेळी कोणाला पावणार, याची उत्सुकता आता ताणली गेली आहे. 1957 पासून झालेल्या अनेक विधानसभा निवडणुकीचा विचार करता यंदाची चुरस अधिक दिसून येते. रिंगणातील बसप-निजद आघाडीचे उमेदवार अॅड रमेश कामत किती मते घेणार, मतविभाजनाचा धोका कोणाला बसणार, याची चर्चा सुरू आहे. माजी आ. सुभाष जोशी यांनी काकासाहेब पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे यावेळी सुभाष जोशी किंगमेकर होणार का तीन माजी आमदारांविरोधात लढणार्या शशिकला जोल्ले यांच्या गळ्यात पुन्हा विजयाची माळ पडणार, याबाबतही अनेक तर्क-वितर्क लढविले जात आहेत.