होमपेज › Belgaon › रेणुका भक्तांना यात्रेसाठी बस दरात सवलत

रेणुका भक्तांना यात्रेसाठी बस दरात सवलत

Published On: Dec 31 2017 1:30AM | Last Updated: Dec 31 2017 12:29AM

बुकमार्क करा
निपाणी : मधुकर पाटील

जानेवारीत सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या होणार्‍या माघी पौर्णिमा यात्रेच्या निमित्ताने भक्तांसाठी निपाणी आगाराने सुविधांची खैरात केली आहे. दोन कोटी व्यवसायाचे उद्दिष्ट ठेवताना महाराष्ट्र एस.टी.पेक्षा प्रति कि.मी. 8 रु. दर कमी आणि दहा वाढीव जागांसह अन्य चार, पाच तीर्थक्षेत्रांचे दर्शन यातून घडवले जाणार आहे. यामुळे यात्रेसाठी आतापासूनच  बुकिंगही सुरू झाले आहे. कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या रेणुका देवीची यात्रा दि. 27 ते 31 जानेवारीपर्यंत भरणार आहे. 30 व 31 हा मुख्य दिवस आहे. यामुळे सौंदत्तीसह अन्य 5 ते 6 तीर्थस्थळांची 600 कि.मी.ची सहल घडविणारे प्रति कि.मी. 34 रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील भक्तांसाठी 97 रु. कि.मी. दर होता. तो आता कमी झाल्याचा फायदा भाविकांना होणार आहे.

परिवहन महामंडळाचे चिकोडी विभागीय नियंत्रक एस. चंद्रशेखर म्हणाले, माघी पौर्णिमेपासून पुढे महिना, दोन महिने भक्तांची सौंदत्ती येथे ये-जा असते. यात्रेला सीमाभाग तसेच कोल्हापूर परिसरातून जाणार्‍या भक्तांची संख्या लक्षणीय असते. प्रशासनाने बसेसची गरज ओळखून नियोजन चालविले आहे. बेळगाव, हुबळी, बागलकोट, चिकोडी, धारवाड, शिर्शी आदी आगारातून 700 बसेची सोय करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्हा अथवा परिसरातून जाणार्‍या भक्तांसाठी जाता येता 600 कि.मी., एक मुक्काम दोन दिवस (48  तास) इतके अंतर नमूद करून प्रति कि.मी. 34 रुपये दर आकारण्यात येत आहे. हाच दर निपाणी व परिसरातील भक्तांसाठी असेल.

या तिकीट दरात भक्तांना सौंदत्तीसह सोगल सोमनाथ, पंत बाळेकुंद्री, मायाक्का चिंचली, गोकाक, नृसिंहवाडी या स्थळांचाही लाभ मिळणार आहे. कोल्हापूर परिसरातून निघणार्‍यांसाठी दराची निश्‍चिती करताना कोल्हापूर सौंदत्ती कोल्हापूर व्हाया वरील तीर्थस्थळे असे नियोजन आहे. निपाणी विभागातून जाणार्‍या भक्तांनाही 34 रु. दर आकारला जाईल. एका बससाठी 55 सीटनुसार एकूण भाडे जीएसटी व सेवाकर वगळून 21 हजार व अनामत रक्कम 2 हजार रुपये असे 23 हजार आकारले जातील. यातील ठेव रक्कम प्रवासानंतर परत केली जाणार आहे.

गेल्या वर्षी यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातून 567 गाड्या धावल्या होत्या. यावर्षी 700 बसेसद्वारे 2 कोटी रुपये उत्पन्न मिळेल, अशी आशा आगाराला आहे. यासाठी निपाणी, चिकोडी विभागातील अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांचे सहकार्य घेतले आहे. नियमित धावणार्‍या इतर मार्गावरील बस कायमस्वरूपी अथवा मुक्कामी राहणार आहेत. निपाणी आगाराकडे चालक, वाहक मिळून 335 इतके कर्मचारी आहेत. रोज 90 मार्गावर बसेस धावत असून त्यामध्ये 36 मुक्कामांचा समावेश आहे. यात्रा वगळता सहलीसाठी जाणारे नागरिक, शाळकरी मुलांना पर्यटन अथवा धार्मिक स्थळांना वरील दरात जाता येणार आहे. यंदा सहलीतून 70 बसेसद्वारे आगाराला 60 लाखांचे उत्पन्न मिळाल्याचे सांगण्यात आले.