Tue, May 21, 2019 00:46होमपेज › Belgaon › निपाणीत 24 तास पाणी योजनेला मुहूर्त सापडेना

निपाणीत 24 तास पाणी योजनेला मुहूर्त सापडेना

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 23 2018 11:56PMनिपाणी : राजेश शेडगे

निपाणी शहरासाठी राबविण्यात येत असलेल्या 24 तास पाणी योजनेचे काम सुमारे 90 टक्के पूर्ण झाले असून शहर व उपनगरांना 12 हजार 500 नळ कनेक्शन मीटर जोडणीसह देण्यात आली आहेत. तर 115 कि. मी. एचडीपी व 4  कि. मी. डीआय पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे. शिवाजीनगरातील संपवेल व जवाहरलाल वॉटर वर्क्स येथील जलशुद्धीकरण घटकाचे काम झाल्याशिवाय पूर्ण क्षमतेने ही योजना सुरू होणार नसल्याचे चित्र दिसत आहे.

एशियन डेव्हलपमेंट बँकेने ही योजना मंजूर केली होती. 10 मे 2010 पासून सदर योजनेचे काम सुरू आहे. तापी कन्स्ट्रक्शन यांनी हे काम 11 नोव्हेंबर 2011 पर्यत पूर्ण करावयाचे होते. त्यानंतर 24 तास पाणी योजना मंजूर झाली ती 28 ऑगस्ट 2014 ला पूर्ण व्हायला हवी होती. परंतु, तापीने काम संथगतीने केले. त्यांना 8 वेळा मुदतवाढ देऊनही काम न केल्याने सदर कंपनीस टर्मिनेट केले गेले. राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी गोकाक येथील कंत्राटदार आर. एन.कित्तूर यांनी सदर योजनेचे टेंडर घेतले आहे. त्यांनी देखील  31 मे 2017 पर्यंत काम पूर्ण करण्याचा करार केला होता. सध्या कित्तूर यांच्याकडून शिवाजीनगर येथील 20 लाख लिटर क्षमतेच्या ओव्हरहेड टँकचे किरकोळ  काम गतीने सुरू असून येथे संपवेलचे बांधकाम  व जलशुद्धीकरण घटकाचे काम सुरू आहे. बिरोबा माळ येथील 4 लाख लिटर क्षमतेच्या ओव्हरहेड टँकचे काम पूर्ण झाले आहे.

 जैन एरिगेशन कंपनीने सिव्हिल वर्क व पाईपलाईनचे  काम पूर्ण केले आहे. सध्या आंबेडकर नगर येथे काँक्रीट रस्ता फोडून पाईपलाईनचे काम सुरू असल्याची माहिती जैनचे अभियंता सुदर्शन यांनी दिली. नदीतून होणारा पाण्याचा उपसा आणि तलावात पडणारे पाणी मोजण्यासाठी तसेच शहरात विविध ठिकाणी होणारा पाणीपुरवठा मोजण्यासाठी इलेक्ट्रो मॅग्नेट फ्लो मशीन सुमारे 27 ठिकाणी बसविले गेले आहे. या योजनेचे कस्टमर केेअर सेंटर म्युनिसिपल हायस्कूल येथे उभारण्यात आले असून सध्या शहरातील ज्या भागात नव्या पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा होत आहे. तेथील मीटर रीडिंग घेऊन मासिक बिले तयार करण्याचा डाटा करण्यात येत आहे.

माने प्लॉट, शिक्का बोर्डिंग, साखरवाडी, जुना पी. बी. रोड, पणदे क्वार्टर्स, अकोळ रोड भागात नव्या पाईपलाईनद्वारे दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. शिवाजीनगर एरियातही पाईपलाईन व नळ कनेक्शनचे काम पूर्ण झाले आहे.  सध्या जवाहर तलावात 39 फूट 7 इंच पाणीसाठा आहे. पुढील पावसाळ्यात जवाहर तलाव भरल्यावरच ही योजना पूर्ण क्षमतेने कायान्वित होणार असल्याने 24 तास पाणी योजनेला अद्याप मूहूर्त  सापडलेला नाही, अशी अवस्था आहे.