Fri, Feb 22, 2019 15:52होमपेज › Belgaon › ‘निपाह’मुळे गडगडले हापूसचे दर

‘निपाह’मुळे गडगडले हापूसचे दर

Published On: May 28 2018 1:46AM | Last Updated: May 27 2018 11:52PMबेळगाव : प्रतिनिधी

रत्नागिरी, देवगड आणि इतर हापूस आंब्यांसाठी बेळगावसह उत्तर कर्नाटकात मोठी बाजारपेठ आहे. गोवा आणि महाराष्ट्र सीमेवर बेळगाव वसल्याने सीमेवरील अनेक ग्राहक आंबा खरेदीसाठी बेळगावात येतात. मात्र, जीवघेण्या निपाह रोगामुळे आंबा दरात दुपटीने घट झाली आहे. याचा फटका उत्पादक आणि विक्रेत्यांना बसला आहे. 

पुणे-बंगळूर महामार्गानजीक असणारे महांतेशनगर, गोव्याकडे जाणारा काँग्रेस रोड तसेच विविध ठिकाणी आंबा विक्रेत्यांनी स्टॉल्स मांडले आहेत. बेळगाव बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आंब्यांची आवक झाली आहे. काही दिवसांपूर्वी देवगड आणि रत्नागिरी हापूस आंब्याचा सव्वा डझनचा दर 700 रुपयांपर्यंत होता. उच्च दर्जाच्या आंब्याचा दर आता कमी झाला आहे. निपाह रोगाच्या भीतीने आंबा खरेदीसाठी ग्राहकांचा थंडा प्रतिसाद मिळत आहे. परिणामी कमी दराने आंबा विक्री होत आहे. 100 ते 150 रुपये डझनापर्यंत आंब्याचा दर घसरला आहे.

मुंबई, बंगळूर बाजारपेठे हापूस आंब्यांचा दर 150 ते 200 रुपये प्रति किलो आहे. किलोला मोठ्या आकाराचे सुमारे पाच आंबे येतात. उत्पादकांकडून कमी दराने आंबा खरेदी झाली तरी वाहतूक, पॅकिंगच्या खर्चामुळे महागड्या दराने मोठ्या शहरात आंबा विक्री होते. 

केवळ रत्नागिरी किंवा देवगडहून बेळगावात आंबा येत नाही. तर धारवाड, कलघटगी, तारिहाळ, शिग्गाव, खानापूर, कित्तूर आणि कर्नाटकातील विविध ठिकाणाहून आंब्याची आवक होते. यामध्ये पायरी, तोतापुरी, इशाडी, निगीराम, मलगोवा अशा विविध प्रकारच्या आंब्यांचा समावेश त्यामध्ये असतो.

आंब्याचा हंगाम सुरू झाला त्यावेळी विक्रेत्यांनी दररोज किमान 50 आंब्याचे बॉक्स विकले.पण, आता दिवसा दहा बॉक्सची विक्री करणेही कठीण बनले आहे. दरम्यान, काही ग्राहकांना आंबा खरेदीबाबत विचारल्यानंतर त्यांनी निपाह रोगाबाबत खबरदारी घेतल्याचे सांगितले. आंबा तर फळांचा राजा असून तो मुलांना खूप आवडतो. पण, निपाहच्या भीतीमुळे सध्यातरी आंबा खरेदी टाळली जात असल्याचे ग्राहक सांगतात.