Sat, May 25, 2019 22:35होमपेज › Belgaon › अवैध धंद्यांविरुद्ध निडसोशी मठाधीशांचा लढा 

अवैध धंद्यांविरुद्ध निडसोशी मठाधीशांचा लढा 

Published On: Mar 11 2018 11:59PM | Last Updated: Mar 11 2018 11:46PMबेळगाव : प्रतिनिधी      

संकेश्‍वर - गडहिंग्लज मार्गावरील मुत्नाळ (ता. गडहिंग्लज) येथे सुरू असलेल्या दारूविक्री व मटका विरोधात निडसोशी (ता. हुक्केरी) येथील मठाधीश पंचम जगद‍्गुरू शिवलिंगेश्वर स्वामींनी उभारलेला लढा यशस्वी झाला आहे. समर्थक भाविकांच्या माध्यमातून उभारलेल्या या लढ्याचे सीमाभागात कौतुक होत आहे. 

बेळगाव जिल्ह्याबरोबर संकेश्‍वर परिसरातील पोलिसांच्या कारवाईमुळे मटका बंद झाला. यातून पळवाट काढून गोकाक, महालिंगपूर, हुक्केरी संकेश्‍वर येथील जुगार्‍यांनी संकेश्वरपासून केवळ 5 कि.मी.वरील मुत्नाळ येथे मटका सुरू केला. याठिकाणी मटका व जुगार खेळणार्‍यांची संख्या वाढू लागली. याकडे तरुणांचा ओढा वाढू लागल्याने निडसोशी मठाधीश शिवलिंगेश्‍वर स्वामींनी याविरोधात लढा उभारला. 

निडसोशी मठाची शाखा म्हणून मुत्नाळ येथे दुरदुंडेश्‍वर मठ आहे.  व्यसनविरोधात नेहमी स्वामी मार्गदर्शनासाठी अग्रेसर आहेत. निडसोशी मठ परिसर विकासाच्या धर्तीवर मुत्नाळही व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरवर्षी येथे स्वामींच्या मार्गदर्शनाखाली अन्नदासोह व ज्ञान पंधरवडा साजरा करुन 10 ते 12 मठाधीशांमार्फत प्रबोधन केले जाते. तरीही गावात दारू विक्री व मटका सुरू असल्याचा खेद स्वामींना होता. त्यातूनच स्वामींनी आपल्या भाविकांना अवैध धंदे बंद करण्याचे फर्मान सोडले. यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष राकेश पाटील, मार्तंड जरळी, परगोंडा पाटील, अशोक मुरगी, गोडसाखरचे संचालक संभाजी नाईक, नाना पाटील, तम्मान्ना रामजी, एल. टी नवलात, मायाप्पा मुगळी, राजगोंडा पाटील यांच्या पुढाकाराने मटका बंदीसाठी गावकर्‍यांना प्रोत्साहन दिले.

स्वामींच्या आवाहनास प्रतिसाद देत स्वामींच्या अध्यक्षतेखाली पोलिस निरीक्षक बिपीन हसबनीस यांनी या मोहिमेला बळ दिले. गावातील तरुण मंडळे, महिला एकत्र येऊन मटक्यावर बंदी आणली. ‘आधी अवैध धंदे बंद करा, नंतर गावची यात्रा’ हा स्वामींचा संकल्प आता सत्यात उतरला आहे. यामुळे बुधवार दि. 21 पासून गावात दूरदुंडेश्वर यात्रा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मटका, जुगारात गावातील तसेच संकेश्वर परिसरातील शेकडो तरूण गुंतले होते. यात काही जणांना घरबसल्या पैसा मिळू लागला. पण अनेकांचे संसारही धुळीस मिळाले होते.