Mon, May 20, 2019 20:05होमपेज › Belgaon › चंदगड तालुक्यात नवीन बेळगाव वसवा

चंदगड तालुक्यात नवीन बेळगाव वसवा

Published On: Feb 15 2018 1:55AM | Last Updated: Feb 15 2018 12:01AMबेळगाव : प्रतिनिधी

महाराष्ट्र—कर्नाटक सीमाप्रश्‍नाचा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यावर राजकीय बोलणे योग्य नाही. मात्र, महाराष्ट्र शासनाने चंदगड तालुक्यात नवीन बेळगावची निर्मिती करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी अपारंपरिक ऊर्जामंत्री विनय कोरे यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे.

पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे व्ही. के. चव्हाण—पाटील महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व प्राचार्य जे. बी. पाटील यांच्या सेवानिवृत्ती गौरव सोहळ्यात ते बोलत होते. ना. चंद्रकांत पाटील, चंदगडच्या आ. संध्यादेवी कुपेकर, गोपाळ पाटील उपस्थित होते. कोरे म्हणाले, महाराष्ट्र शासनाने चंदगड तालुक्यात 15 हजार एकर जमीन संपादित करावी. ती करताना कोणावरही अन्याय होऊ नये. संबंधित जमीन मालकांना योग्य मोबदला देऊन या भागाला विशेष आर्थिक क्षेत्राचा दर्जा द्यावा. सर्व सोयीसुविधा पुरवा. नवे बेळगावच तयार होईल. या संकल्पनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे. ना. पाटील यांनीही पुढाकार घ्यावा. 

लातूर सीमाभागातील शाळा— महाविद्यालयांप्रमाणे बेळगाव भागातील विनाअनुदानित शाळा— महाविद्यालयांना शंभर टक्के अनुदान देऊन सरकारने मराठी भाषा आणि भाषिकांना जिवंत ठेवावे, असेही कोरे म्हणाले.

ना. पाटील म्हणाले, बेळगाव सीमाभागातील विद्यार्थ्यांवर कन्नड भाषेची सक्‍ती केली जात आहे. यामुळे मराठी विद्यार्थी मातृभाषा विसरत चालला आहे. कन्नड सरकारची ही सक्‍ती अयोग्य आहे. मुलांना मातृभाषेत शिक्षण मिळायलाच पाहिजे. यासाठी सीमाभागातील आणि महाराष्ट्र हद्दीच्या जवळच्या महाविद्यालयात शिक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. सीमाभागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक अनुदान सुरू करणार आहोत.

याआधीही होता प्रस्ताव

कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावर तोडगा म्हणून चंदगड तालुक्यातील शिनोळी गावाज़वळ प्रतिबेळगाव वसवावे, असा प्रस्ताव 1994 मध्ये विचाराधीन होता. त्याला काही नेत्यांची मान्यताही होती. पण तो बारगळला. त्यानंतर भवानीनगरच्या माळावर प्रतिबेळगाव वसवण्याबाबतचही शरद पवार  यांच्या संरक्षणमंत्रीपदाच्या काळात चर्चा झाली होती. मात्र हा मुद्दा चर्चेपलीकडे जाऊ शकला नाही. चंदगड तालुक्यात प्रतिबेळगाव वसवण्यासाठी मात्र जागेची पाहणीही झाली होती. बेळगावच्या रहिवाशांना त्यांच्या मालमत्तेइतकीच मालमत्ता प्रतिबेळगावमध्ये देण्यात येणार होती. महाराष्ट्र सरकारने हा प्रकल्प विचारार्थ घेतला होता. पण तो पुढे सरकला नाही. आता विनय कोरे यांनी तो पुन्हा चर्चेला आणला आहे.